दक्षिण आफ्रिकेला १५२ धावांत गुंडाळल्यावर दिवसअखेरीस ५ बाद १४५
ब्रिस्बेन : गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर डावखुऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीचा ऑस्ट्रेलियाला शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिलासा मिळाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५२ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ५ बाद १४५ अशी धावसंख्या होती.
गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. काएल व्हेरेने (६४) आणि टेम्बा बव्हुमा (३८) यांचा अपवाद वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला १५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायन (३/१४), मिचेल स्टार्क (३/४१), स्कॉट बोलँड (२/२८) आणि पॅट कमिन्स (२/३५) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली .
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. त्यानंतर मार्को यान्सेनने वैयक्तिक पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर मार्नस लबूशेनचा (११), तर आनरिख नॉर्किएने उस्मान ख्वाजाचा (११) अडसर दूर केला. मात्र, हेडने ७७ चेंडूंत नाबाद ७८ धावांची आक्रमक खेळी करताना ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. हेडने आपल्या खेळीत १३ चौकार व एक षटकार लगावताना स्टीव्ह स्मिथच्या (३६) साथीने चौथ्या गडय़ासाठी ११७ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ४८.२ षटकांत सर्वबाद १५२ (काएल व्हेरेने ६४, टेम्बा बव्हुमा ३८; नॅथन लायन ३/१४, मिचेल स्टार्क ३/४१)
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३३.१ षटकांत ५ बाद १४५ (ट्रॅव्हिस हेड नाबाद ७८, स्टीव्ह स्मिथ ३८; आनरिख नॉर्किए २/३७, कॅगिसो रबाडा २/५०)