ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाता : महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश येत असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’ असा शिक्का लावला जातो. आता हाच शिक्का पुसण्याचे दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर आव्हान असून एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज, गुरुवारी त्यांचा पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.

यजमान भारतीय संघाइतकेच सातत्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या वेळी दाखवले आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडणे आफ्रिकेला इतके सहज जाणार नाही. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होणाऱ्या आजच्या सामन्यात विजय मिळवत प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ अतोनात प्रयत्न करेल यात शंका नाही.

हेही वाचा >>> खेळपट्टीवरून वादंग!

विश्वचषक आणि विजेतेपद हे ऑस्ट्रेलियासाठी समीकरण होऊन बसले आहे. आतापर्यंतच्या १२ पैकी ५ स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मात्र जेतेपदापर्यंत कधीही पोहोचता आलेले नाही. सुरुवातीपासून सर्वोत्तम खेळाचे दर्शन घडवायचे, पण महत्त्वाच्या सामन्यात निराशा करायची, असा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा इतिहास आहे. मग, विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणात डकवर्थ-लुईसचा बसलेला फटका असो किंवा मग १९९९ मधील ऑस्ट्रेलियाशी झालेली बरोबरी असो, दक्षिण आफ्रिका संघ कधीही उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकलेला नाही. हाच इतिहास बदलण्यासाठी यावेळी टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ सज्ज असेल.

दोन्ही संघांच्या प्रवासाचा एक समान धागा म्हणजे त्यांची खरी ताकद त्यांच्या फलंदाजीत राहिली आहे.

दक्षिण आफ्रिका

* सलामीवीर क्विंटन डिकॉक आफ्रिकेसाठी सर्वात महत्त्वाचा फलंदाज ठरला असून त्याच्या नावे चार शतके आहेत. कर्णधार टेम्बा बव्हुमा मात्र आपल्या फलंदाजीतील कौशल्याला न्याय देऊ शकलेला नाही. बव्हुमाला वगळून रीझा हेंड्रिक्सला संधी देण्याचा पर्याय आफ्रिकेकडे आहे.

* सलामीवीरांकडून चांगली सुरुवात झाल्यास पुढे रासी व्हॅन डर डसन, एडन मार्करम, हेन्रिक क्लासन, डेव्हिड मिलर यांच्यात आक्रमक खेळी करून दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारून देण्याची क्षमता आहे. 

* दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची भिस्त कगिसो रबाडा आणि मार्को यान्सनवर असेल. त्यांना लुंगी एन्गिडीची साथ लाभेल. केशव महाराजला कामगिरी उंचावण्यासाठी वाव आहे.

ऑस्ट्रेलिया

* डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव स्मिथ, मार्नस लबूशेन, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल असे एकापेक्षा एक सरस फलंदाज ऑस्ट्रेलिया बाळगून आहे.

* अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना लबूशेन आणि मार्कस स्टोइनिस यांच्यापैकी कोणाची निवड करायची हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल. स्टोइनिसला यंदाच्या स्पर्धेत फारशी चमक दाखवता आलेली नाही.

* मिचेल स्टार्कचे पुनरागमन अपेक्षित असून जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांनाही आपली भेदकता दाखवावी लागणार आहे. नवा चेंडू हाताळणाऱ्या गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले, तर झ्ॉम्पाचे काम अधिक सोपे होणार आहे.

* वेळ : दुपारी २ वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia vs south africa icc cricket world cup 2023 2nd semi final match preview zws