सिडनी : सलामीवीर उस्मान ख्वाजाची (नाबाद १९५ धावा) कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि स्टीव्ह स्मिथच्या (१०४) दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद ४७५ अशी धावसंख्या केली.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) सुरू असलेल्या या सामन्याचा दुसरा दिवस ख्वाजा आणि स्मिथ यांनी गाजवला. या दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी २०९ धावांची अप्रतिम भागीदारी रचली. ख्वाजाने ३६८ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९५ धावा केल्या आहेत. ख्वाजाचे हे कसोटी कारकीर्दीतील १३ वे आणि ‘एससीजी’वरील सलग तिसरे शतक ठरले. स्मिथने त्याला तोलामोलाची साथ दिली. स्मिथने ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १९२ चेंडूंत १०४ धावांची खेळी साकारली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी २ बाद १४७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. ख्वाजा आणि स्मिथ जोडीने ६० षटके फलंदाजी करताना द्विशतकी भागीदारी रचली. स्मिथ डावखुरा फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ख्वाजाने ट्रॅव्हिस हेडच्या (५९ चेंडूंत ७०) साथीने चौथ्या गडय़ासाठी ११२ धावा जोडल्या. आक्रमक शैलीत खेळणाऱ्या हेडला कॅगिसो रबाडाने बाद केले. दिवसअखेर ख्वाजासह मॅथ्यू रेनशॉ (नाबाद ५) खेळपट्टीवर होता. ३० स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकीर्दीतील ३०वे शतक झळकावले. त्यामुळे त्याने दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (२९) यांना मागे टाकले. ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग (४१) आणि स्टीव्ह वॉ (३२) यांनीच स्मिथपेक्षा अधिक शतके झळकावली आहेत. स्मिथने मॅथ्यू हेडनच्या ३० शतकांच्या कामगिरीशी बरोबरी साधली.