मुंबई : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केले असले तरी ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याद्वारे मालिकेत झोकात पुनरागमन करेल, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी मंगळवारी व्यक्त केली. मात्र भारतच मालिका विजयासाठी प्रबळ दावेदार आहे, असेही ते म्हणाले.
घावरी म्हणाले, ‘‘भारताने मालिकेत १-० आघाडी घेतली, हे चांगलेच आहे. मात्र अद्याप तीन सामने शिल्लक असून भारताला सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत मुसंडी मारल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. मात्र भारताचे पारडे नक्कीच जड आहे, हे निश्चित.’’
चेतेश्वर पुजाराच्या खेळीविषयी घावरी म्हणाले, ‘‘पुजारा ही भारताची जणू भिंत आहे. जसा राहुल द्रविड भारतीय संघाला सावरायचा, त्याचप्रमाणे आता पुजारा संघाचा डाव सावरत आहे. त्यामुळे तो खेळपट्टीवर असताना चाहत्यांना चिंता नसते. भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने ही नक्कीच सुखद गोष्ट आहे.’’ याव्यतिरिक्त, प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांचीदेखील ऑस्ट्रेलियाला प्रकर्षांने उणीव जाणवत आहे, असे घावरी म्हणाले.