Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: गेल्या दीड महिन्यापासून विश्वचषकात आपला दबदबा निर्माण केलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सलग १० सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी पहिली पसंती दिली जात होती. मात्र, विजयासाठी भारतानं दिलेलं २४१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ६ गडी राखून सहज पार केलं. त्यामुळे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या भारताच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात आक्रमक सुरुवात करून देणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्यातील पराभवानंतर भावनिक झाल्याचं दिसून आलं.
भारतीय फलंदाजी ढेपाळली
गेल्या १० सामन्यांमध्ये तडाखेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय फलदाजांना अंतिम सामन्यात आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मानं तडाखेबाज सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहली व के. एल. राहुल यांनी अर्धशतक झळकावून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव या फलंदाजांनी निराशा केली. परिणामी मोठ्या प्रयत्नांनंतर भारताची धावसंख्या ५० षटकांत २४० पर्यंत पोहोचली.
ट्रेविस हेडनं भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळवलं
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली होती. बुमरा, शमी व सिराज या त्रिकुटानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. परिणामी पहिल्या १० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद झाले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा आक्रमक गोलंदाजी करत विश्वविजय साकार करून देणार अशी आशा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला वाटू लागली होती. पण सलामीवीर ट्रेविस हेडनं मार्नस लाबुशेनच्या साथीनं ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. १२० चेंडूंमध्ये १३७ धावा फटकावणाऱ्या हेडनं खऱ्या अर्थानं विजय भारताच्या हातून काढला. हेड बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारला.
गेल्या दीड महिन्यांच्या मेहनतीचं फळ विश्वचषकाच्या रुपात न मिळाल्याचं दु:ख मैदानावरच्या प्रत्येक भारतीय खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. जिथे इतर खेळाडू भावना आवरण्याचा यशस्वी प्रयत्न करत होते, तिथे मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिल्याचं स्पष्ट दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मानंही विरोधी संघाचे खेळाडू, संघ व्यवस्थापनातील सहकारी अशा सगळ्यांशी प्रथेप्रमाणे हस्तांदोलन केलं. तोपर्यंत त्यानं भावना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शेवटी मैदानाच्या बाहेर पडताना रोहित शर्माच्याही डोळ्यांत अश्रू तरळल्याचं दिसलं.
सगळ्यांशी हस्तांदोलन झाल्यानंतर वेगानं रोहित शर्मा मैदानाबाहेर गेला आणि ड्रेसिंग रुमच्या पायऱ्या चढून जाताना दिसला. मैदानाबाहेर जाणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू होता. त्याच्यापाठोपाठ भारतीय संघाचे इतर खेळाडूही ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसून आले.