अवघ्या काही महिन्यांपूर्वी अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पानिपत झाले होते. त्या वेळी चाहते तसेच प्रसारमाध्यमांच्या टीकेचा भडिमार ऑस्ट्रेलियन संघाला सहन करावा लागला होता. ही सगळी टीका पचवत, जबरदस्त सांघिक कामगिरीच्या जोरावर मायभूमीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चीतपट करत प्रतिष्ठेच्या ‘अ‍ॅशेस’ मालिकेवर कब्जा केला. ब्रिस्बेन, अ‍ॅडलेडपाठोपाठ पर्थ कसोटीही जिंकत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर प्रभुत्व सिद्ध केले. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पर्थ कसोटीच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सची गरज होती तर इंग्लंडला विजयासाठी २५३ धावांची आवश्यकता होती. डावखुऱ्या बेन स्टोक्सने पहिलेवहिले कसोटी शतक झळकावताना झुंजार खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ न लाभल्याने इंग्लंडला १५० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. स्टोक्सने १८ चौकार आणि एका षटकारासह १२० धावा केल्या. मिचेल जॉन्सनने ४ तर नॅथन लियॉनने ३ बळी घेतले. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या स्टिव्हन स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘‘या क्षणी काय बोलावे, हे सुचत नाहीये. ऑस्ट्रेलियाच्या संघाने अ‍ॅशेस परत मिळवली आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही. विजयात योगदान देणारा प्रत्येकजण कौतुकास पात्र आहे,’’ अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने भावना व्यक्त केल्या.  
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ३८५ आणि ६ बाद ३६९ (डाव घोषित) विजयी विरुद्ध इंग्लंड : २५१ आणि ३५३ (बेन स्टोक्स १२०, इयान बेल ६०, मिचेल जॉन्सन ४/७८).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा