अॅशेस करंडक परंपरागत प्रतिस्पध्र्याकडून परत मिळवण्याच्या ईष्रेने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात २१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. अॅडलेडवर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी यजमान संघाने फक्त तासाभरात इंग्लंडच्या उर्वरित चार फलंदाजांना तंबूची वाट दाखवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
आता तीन सलग मालिका गमावल्यानंतर अॅशेसवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आणखी एका कसोटी विजयाची आवश्यकता आहे.
ब्रिस्बेनवरील पहिली कसोटी इंग्लंडने ३८१ धावांनी गमावली होती. त्यानंतर आणखी एका पराभवाचा धक्का इंग्लिश संघाला बसला आहे. शुक्रवारी पर्थ येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. या पाश्र्वभूमीवर इंग्लंडचा संघ सावरण्याचा प्रयत्न करील. वेगवान गोलंदाजांना अनुकूल वाकाच्या खेळपट्टीवर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या १२ सामन्यांपैकी फक्त एकदा विजय मिळवला आहे.
‘‘आम्हाला अखेरीस अनुकूल निकाल मिळतो आहे, हे सर्वात सुखदायी आहे, असे मला वाटते. आता जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज करण्याचे ध्येय आम्ही निश्चित केले आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे,’’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केली.
पहिल्या दिवशी सोडलेल्या अनेक झेलमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९ बाद ५७० अशी आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाला पराभव पत्करावा लागला, अशी कबुली इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने दिली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९ बाद ५७० डाव घोषित
इंग्लंड (पहिला डाव) : १७२
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३ बाद १३२ डाव घोषित
इंग्लंड (दुसरा डाव) : सर्व बाद ३१२ (जो रूट ८७, केव्हिन पीटरसन ५३, मॅट प्रायर ६९; रयान हॅरिस ३/५४, पीटर सिडल ४/५७).
अॅशेस जिंकण्याकडे ऑस्ट्रेलियाची वाटचाल!
अॅशेस करंडक परंपरागत प्रतिस्पध्र्याकडून परत मिळवण्याच्या ईष्रेने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात २१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे.
First published on: 10-12-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia wins 2nd ashes test by 218 runs