भारतीय संघाने नुकतीच विंडीजला तीनही प्रकारच्या मालिकेत धूळ चारली. कसोटी मालिका भारताने २-० ने जिंकली. एकदिवसीय मालिका ३-१ ने खिशात घातली. तर टी२० मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. आता २१ नोव्हेंबरपासून भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून टी२० मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांचा समावेश नसणार आहे. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांच्याशिवाय ऑस्ट्रेलिया संघ म्हणजे कोहली, रोहितशिवाय भारतीय संघ असे वक्तव्य भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने केले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला या वेळी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना स्थान नाही. अशा वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ तुलनेने दुबळा म्हणता येईल. कारण स्मिथ आणि वॉर्नर म्हणजे ऑस्ट्रेलियाचे विराट आणि रोहित आहेत. स्मिथ आणि वॉर्नर यांच्याशिवाय ऑस्ट्रेलिया संघ म्हणजे कोहली, रोहितशिवाय भारतीय संघ अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे गांगुली म्हणाला.

भारताविरुद्धची मालिका लक्षात घेता ऑस्ट्रेलियात स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडण्याप्रकरणी लादण्यात आलेली बंदी उठविण्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलिया या तिघांवर घातलेली बंदी उठवण्याबाबत घाई करणार नाही, हे निश्‍चित आहे. ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ आणि वॉर्नर नसल्याचा खूप मोठा फरक पडत आहे. अलीकडच्या सामन्यातील त्यांच्या कामगिरीवरून हेच दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात विजय मिळविण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे, असेही गांगुलीने सांगितले.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये पराभूत झाला होता. मात्र, ऑस्ट्रेलियात ही परिस्थिती निश्‍चित बदलेल, असा विश्‍वासही गांगुलीने व्यक्त केला. भारतीय संघ इंग्लंडमध्ये हरला असला, तरी त्या मालिकेत बहुतेक वेळा कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला दोन वेळा बाद करण्याची कामगिरी साधली होती.

Story img Loader