नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ धावांनी पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुवर्ण आणि भारताला रौप्य पदक मिळाले. या महत्त्वाच्या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने मोठा निर्णय घेतला आहे. तिने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याचे जाहीर केले आहे.
येत्या काही काळात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला पाकिस्तान आणि भारताविरुद्ध मालिका व दक्षिण आफ्रिकेत होणारा टी २० विश्वचषक खेळायचा आहे. असे असताना मेगने क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयाबद्दल मेग म्हणली, “दोन वर्षांच्या व्यस्त वेळापत्रकानंतर मी आता स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे, त्यासाठी मी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि माझ्या संघसहकाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या काळात माझ्या गोपनीयतेचा आदर केला जावा, अशी मी विनंती करते.”
हेही वाचा – ट्रेंट बोल्टचा मोठा निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार
क्रिकेट ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटचे कार्यप्रदर्शन प्रमुख, शॉन फ्लेग्लर यांनी मेग लॅनिंगच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तिला विश्रांतीची गरज आहे हे मान्य केल्याबद्दल आम्हाला मेगचा अभिमान वाटतो. गेल्या दशकभरापासून ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देत आहे. तिने वैयक्तिकरित्या आणि संघाचा भाग म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आम्ही तिला कायम पाठिंबा देत राहू. “
मेग लॅनिंगने २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१४मध्ये वयाच्या २१व्या वर्षीय कर्णधार म्हणून तिची नियुक्त झाली होती. तिने सर्व फॉरमॅटमध्ये १७१ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी १३५ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवले आहेत. सर्वात उल्लेखनीय म्हणजे २०१७ पासून तिने फक्त पाच आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.