हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथल्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या ट्रान्सटास्मानियन लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने रचीन रवींद्रचं शतक आणि जेम्स नीशामचं अर्धशतक यांच्या वादळी खेळीच्या बळावर विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर नीशाम बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला. या सामन्यात ६५ चौकार आणि ३२ षटकार पाहायला मिळाले.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग जोडीने ६१ धावांची सलामी दिली. जोश हेझलवूडने कॉनवेची खेळी संपुष्टात आणली. पाठोपाठ विल यंगलाही त्यानेच तंबूत धाडलं. यानंतर डॅरेल मिचेल आणि रचीन रवींद्र जोडीने ८६ चेंडूत ९६ धावांची वेगवान भागीदारी केली. झंपाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा मिचेलचा प्रयत्न मिचेल स्टार्कच्या हातात जाऊन विसावला. कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलीप्स झटपट बाद झाले पण रचीन रवींद्रने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याच्या शतकामुळेच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित राहिल्या. रवींद्रने ७७ चेंडूत शतक पूर्ण केलं. वर्ल्डकप स्पर्धेतलं त्याचं हे दुसरं शतक आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने रवींद्रला बाद केलं. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. रवींद्र बाद झाल्यानंतर नीशामने सूत्रं हाती घेतली. सँटनरने १२ चेंडूत १७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. नीशामने ३९ चेंडूत ५८ धावा करत न्यूझीलंडला जिंकून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शतकांच्या बळावर ३८८ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाक्षणी २४ षटकात २०० अशा सुस्थितीत होता मात्र त्यानंतर त्यांची धावगती मंदावली आणि विकेट्सही गमावल्या. चार चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव ३८८ धावांवर आटोपला. वॉर्नर-हेड जोडीने चौकार, षटकारांची लयलूट करत १७५ धावांची सलामी दिली. ग्लेन फिलीप्सने वॉर्नरला ८१ धावांवर बाद केलं. त्याने ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६५ चेंडूत ८१ धावा केल्या. दुसरीकडे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हेडने किवी गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ५९ चेंडूत शतक पूर्ण केलं. हेडचा हा पहिलाच वर्ल्डकप आहे. वर्ल्डकप पदार्पणात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्याने खणखणीत शतक साजरं केलं. फिलीप्सनेच हेडचा अडथळा दूर केला. त्याने १० चौकार आणि ७ षटकारांसह ६७ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. यामुळेच त्यांना ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ग्लेन मॅक्सवेल (४१), जोश इंगलिस (३८), पॅट कमिन्स (३७) यांनी उपयुक्त खेळी केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलीप्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने धावांचा इमेल उभे करताना विक्रमांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मिळून २० षटकार लगावले. वनडेतला हा विक्रम आहे. सलग तीन सामन्यात ३५० पल्याड धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या संघाने केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १० षटकात ११८ धावा लूटल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात कॅमेरुन ग्रीनला वगळून ट्रॅव्हिस हेडला खेळवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने मार्क चॅपमनऐवजी जेम्स नीशामला खेळवलं.
हेडचं दमदार पुनरागमन
दीड महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील मालिकेदरम्यान हेडच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने तो वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार का याविषयी साशंकता होती. तरीही निवडसमितीने वर्ल्डकपसाठी संघ घोषित करताना हेडचा संघात समाविष्ट केला. हेड वर्ल्डकपच्या पूर्वार्धात खेळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वर्ल्डकप सुरू झाल्यानंतर अॅडलेडमध्ये रिहॅब प्रक्रियेचा भाग तो भाग होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याआधी हेडचं भारतात आगमन झालं. दुखापतीतून सावरल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी हेडचा अंतिम अकरात समावेश करण्यात आला. संघव्यवस्थापनाचा विश्वास हेडने सार्थ ठरवत तडाखेबंद शतकी खेळी साकारली.