मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करुन 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 137 धावांनी तिसरा कसोटी सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाला या सामन्यात फारशी संधीच दिली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारकाळ तग धरु शकले नाहीत. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम हिक यांनी आपल्या संघातील फलंदाजांना विराट कोहलीकडून काही गोष्टी शिकून घेण्याचा सल्ला दिला आहे.
अवश्य वाचा – IND vs AUS : भारताच्या गोलंदाजी फळीचं राहुल द्रविडकडून कौतुक
“विराट आणि चेतेश्वर पुजाराबद्दल आम्ही काही रणनिती आखल्या होत्या. हे दोन्ही फलंदाज पहिले 25-30 चेंडू सहज टिकले तर नंतर त्यांना बाद करणं कठीण जातं. विशेषकरुन विराट ज्या पद्धतीने आपल्या संघाच्या डावाला आकार देतो ते पाहण्यासारखं असतं. जर आपण त्याच्यासारखी फलंदाजी करता येत नसेल तर त्याचा खेळ पाहून तुम्ही त्यातून नक्कीच शिकू शकता.” SEN रेडीयोला दिलेल्या मुलाखतीत हिक बोलत होते. विराट कोहलीसारखा खेळ करणं सोपी गोष्ट नाही. यासाठी प्रचंड मेहनत आणि संयमाची गरज असते. विराट कोहलीच्या अंगात असणारे असे अनेक गुण ऑस्ट्रेलियन फलंदाज आत्मसात करु शकतात.
मेलबर्न कसोटीत तळातल्या फळीतल्या पॅट कमिन्सचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय आक्रमणाचा सामना करु शकला नाही. कमिन्सने लॉयनच्या मदतीने चौथा दिवस तग धरुन भारताचा विजय लांबवला. या मालिकेतला चौथा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीच्या मैदानात खेळवला जाणार आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतीय कर्णधाराला ऑस्ट्रेलियन भूमिकत कसोटी मालिका जिंकण्याची संधी आलेली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघ ही किमया साधतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.