मेलबर्न : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेदरम्यान अष्टपैलू कॅमेरून ग्रीन व मिचेल मार्श यांनी गोलंदाजीत अधिक जबाबदारी घेणे अपेक्षित असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला. नोव्हेंबरमध्ये भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
‘‘संघात अष्टपैलू खेळाडू असल्याचा नेहमीच फायदा मिळतो. गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्यांचा पुरेसा वापर केलेला नाही. मात्र, आगामी हंगामात काही वेगळे पाहायला मिळू शकते. आम्ही ग्रीन व मार्शला गोलंदाजीत अधिक जबाबदारी देऊ शकतो. ग्रीनने शील्ड क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. मात्र, कसोटीत त्याला अधिक गोलंदाजी करावी लागली नाही. तो आता अधिक परिपक्व खेळाडू झाला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर थोडे अधिक निर्भर असू,’’ असे कमिन्सने सांगितले. २५ वर्षीय ग्रीनने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत २८ कसोटी सामन्यांत ३५ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा : विनेशची याचिका फेटाळल्याचे कारण क्रीडा लवादाकडून स्पष्ट, मर्यादेपेक्षा कमी वजनाची जबाबदारी खेळाडूची
‘‘ग्रीन व मार्श यांना केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर शीर्ष सहामध्ये स्थान मिळेल का, हा पहिला मुद्दा आहे. नॅथन लायनसारखा गोलंदाज असल्याने आम्ही नशीबवान आहोत. त्याच्याकडून आम्ही षटके गोलंदाजी करवून घेऊ शकतो. अशात संघात एक अष्टपैलू असणे गरजेचे आहेच असे नाही. मात्र, पाचवा गोलंदाजाचा पर्याय असल्यास फरक पडतो. आमच्याकडे ग्रीन व मार्श यांच्या रूपाने गोलंदाजीत सहा पर्याय आहेत. जी चांगली गोष्ट आहे. मात्र, शीर्ष फळीतील सहा फलंदाजांनी केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावरच संघात स्थान मिळवले पाहिजे,’’ असे कमिन्स म्हणाला.