नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांत कसोटी मालिका जिंकली, त्यात तडाखेबंद यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे योगदान निर्णायक ठरले होते. त्यामुळे आगामी मालिकेत आम्ही त्याला रोखणे आवश्यक आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने केले.यंदा पाच सामन्यांच्या बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ‘‘गेल्या दोन मालिकांमध्ये पंतचा प्रभाव खूप मोठा होता. भारताला एकहाती सामना जिंकवून देण्याची पंतमध्ये क्षमता आहे. त्यामुळे आगामी मालिकेत त्याला कमीतकमी धावांत रोखण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागेल,’’ असे कमिन्स म्हणाला.

आपल्या वैविध्यपूर्ण आणि थक्क करणाऱ्या फटक्यांनी गोलंदाजांवर दडपण आणणाऱ्या पंतने ऑस्ट्रेलियातील गेल्या दोन मालिकांत मिळून १२ डावांत ६२.४०च्या सरासरीने ६२४ धावा केल्या. यात त्याने नाबाद १५९ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. ‘‘पंतसारखा फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्धही ‘रीव्हर्स स्लॅप’ किंवा अन्य एखादा आश्चर्यचकित करणारा फटका मारू शकतो. आम्हाला आता याची सवय झाली आहे. प्रत्येक संघात एक-दोन खेळाडू असे असतात, जे आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणतात. आमच्या संघात ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श ते काम करतात. भारताकडून पंत असा आक्रमक खेळ करतो. कितीही दडपण असले तरी तो आपल्या शैलीत बदल करत नाही. हेच त्याला खास बनवते,’’ असे कमिन्सने सांगितले.