Australian Cricketer Cartwright Leaves Match Mid Way For Birth of His Child: क्रिकेटमध्ये अनेकदा फलंदाजी करत असलेला खेळाडू दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जाऊ शकतो, असं घडतानाही आपण अनेकदा पाहिलं आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू चालू सामन्यातच रिटायर्ड होत आपल्या बाळाच्या जन्मासाठी गेला, पण नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया.
वेस्ट ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू हिल्टन कार्टराईट सध्या चर्चेत आहे. त्याच्या मुलाच्या जन्माची बातमी ऐकून तो चालू सामन्यात रिटायर होऊन बाहेर पडला. यावेळी शेफिल्ड शील्ड स्पर्धेत वेस्ट ऑस्ट्रेलिया संघाचा सामना तस्मानिया विरुद्ध सुरू होता. दरम्यान, हिल्टनला त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची माहिती मिळताच त्याने सामना अर्ध्यातच सोडला. तो नाबाद ५२ धावांवर खेळत होता. तेवढ्यात टी-ब्रेकही झाला होता, या टी ब्रेक दरम्यान त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला की ती हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. हे ऐकताच तो लगेच सामना सोडून हॉस्पिटलमध्ये निघाला.
३१ वर्षीय खेळाडूने स्वतः सांगितले की, माझी पत्नी तमिका गरोदर होती. त्यामुळे माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे सामन्यावर परिणाम होऊ नये, असे मला वाटत होते. म्हणून नंतर मी लगेच येऊन पुन्हा सामना खेळलो. सामना अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती आणि त्यांनी मला खूप मदत केली. तो पुढे म्हणाला की, तस्मानिया संघालाही या गोष्टीची माहिती होती. यावेळी संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधाराने मी केव्हा जाऊन परत येऊ शकतो, याचं संपूर्ण नियोजनही केलं होतं.
दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर, कार्टराईटने मैदानात शानदार पुनरागमन केले आणि WACA मैदानावर आपला डाव पूर्ण केला. मात्र, हॉस्पिटलमधून परतल्यानंतर सामनाधिकारी त्याला मैदानावर पुन्हा जाण्याची परवानगी देतील की नाही, अशी चिंता त्याला सतावत होती. पण चर्चा केल्यानंतर तो पुन्हा क्रीझवर परतला आणि त्याने ६५ धावांची खेळी खेळली.
कार्टराईटच्या खेळीमुळे पश्चिम ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३२ धावा केल्या. ८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कार्टराईटने नंतर नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाला ६ गडी राखून विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावलीय. मात्र, कार्टराईटला हा दिवस मैदानावर आणि मैदानाबाहेरील या घटनेमुळे नेहमी लक्षात राहील.
क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक अनोखे किस्से पाहायला मिळतात. पण एखाद्या खेळाडूने मुलाच्या जन्मामुळे सामना अर्धवट सोडण्याची आणि परतण्याची ही पहिलीच वेळ आहे.