Will Pucovski retired hurt after massive helmet blow in Sheffield Shield clash : ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा शेफिल्ड शील्डमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली. टास्मानिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात व्हिक्टोरिया संघाचा फलंदाज विल पुरोव्स्की हा चेंडू डोक्याला लागल्याने दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. पुकोव्स्की आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १३व्यांदा बाउन्सर बॉलचा बळी ठरला आहे.
यावेळी तो फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा तस्मानिया संघाचा वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथचा बाऊन्सर बॉल समजण्याआधीच तो थेट त्याच्या हेल्मेटला जाऊन धडकला. पुकोव्स्की या डावातील फक्त दुसरा चेंडू खेळत होता. यानंतर दुखापत झाल्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चेंडू लागताच पुकोव्स्की खेळपट्टीवर पडला –
डावातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी विल पुकोव्स्की ऑफ स्टंपच्या जवळ आला, परंतु मेरेडिथने बाउन्सर बॉल फेकला, जो त्याला अजिबात समजू शकला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्यावर आदळल्यानंतर पुकोव्स्की थेट खेळपट्टीवर पडला आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर आणि व्हिक्टोरिया संघाचे फिजिओ लगेच मैदानात येऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस करत होते, त्यानंतर त्यांनी विलला बाहेर घेऊन जाण्या निर्णय घेतला.विलला पुकोव्स्की बाहेर गेल्याने त्याच्या जागी व्हिक्टोरिया संघाने कॅम्पबेल कॅलवेला प्लेइंग इलेव्हनमध्ये कनक्शन खेळाडू म्हणून सामील केले. या सामन्यात व्हिक्टोरिया संघाला विजयासाठी ४४२ धावांचे लक्ष्य मिळाले असून त्याचा पाठलाग करताना त्यांनी 3 गडी गमावून २६० धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी! ३.६ कोटींना खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूचा झाला अपघात
क्रिकेट व्हिक्टोरियाने पुकोव्स्कीच्या प्रकृतीची दिली माहिती –
क्रिकेट व्हिक्टोरियाने विल पुकोव्स्कीच्या प्रकृतीवर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की वैद्यकीय कर्मचारी त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत आणि आम्ही तुम्हाला विलच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण अपडेट देत राहू. याआधी फेब्रुवारी महिन्यात न्यू साउथ वेल्सविरुद्धच्या सामन्यातही बाउन्सर चेंडू डोक्याला लागल्याने पुकोव्स्कीला दुखापत झाली होती. याआधी पुकोव्स्कीनेही मानसिक आरोग्यामुळे काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. आतापर्यंत, विलला ऑस्ट्रेलियन संघाकडून फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने एकूण ७२ धावा केल्या आहेत.