मर्सिडीझचे ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि निको रोसबर्ग यांनी ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या पहिल्या दोन सराव शर्यतींवर वर्चस्व गाजवत मुख्य शर्यतीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. पहिल्या सत्रात तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्यानंतरही हॅमिल्टनने आपला जर्मनीचा सहकारी रोसबर्गला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते.
हॅमिल्टनने मऊ रबराचे टायर वापरत १ मिनिट २९.६२५ सेकंद अशी वेळ नोंदवली. रोसबर्गने १ मिनिट २९.७८२ सेकंदांसह दुसरा क्रमांक पटकावला. मर्सिडीझचे ड्रायव्हर वगळता कुणालाही १ मिनिट ३० सेकंदांखाली कामगिरी नोंदवता आली नाही. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोला १.३०.१३२ सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चार वेळा विश्वविजेता ठरलेला रेड बुलचा सेबॅस्टियन वेटेल १.३०.३८१ सेकंदांसह चौथा आला. मॅकलॅरेनचा माजी विश्वविजेता ड्रायव्हर जेन्सन बटनने पाचवे स्थान प्राप्त केले. रेड बुलचा डॅनियल रिकार्डियो सहावा, तर फेरारीचा किमी रायकोनेन सातवा आला. सहारा फोर्स इंडियाचा ड्रायव्हर निको हल्केनबर्गने अव्वल १० जणांमध्ये स्थान मिळवले.
चाहत्यांची इंजिनच्या आवाजाबद्दल तक्रार
‘व्हॅक्यूम क्लीनर’सारखा आवाज करणाऱ्या कारमधील इंजिनाबाबत चाहत्यांनी तक्रार केली असली तरी नव्या बदलांशी जुळवून घेण्याचे आवाहन संघमालकांनी चाहत्यांना केले आहे. कानठळ्या बसतील इतका आवाज करणारे इंजिन आता कमी आवाजाचे झाले आहे. त्यामुळे वेगाचा थरार अनुभवताना मजा येत नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. ‘‘२२ व्हॅक्यूक क्लीनरमध्ये शर्यत रंगल्याचे जाणवते. फॉम्र्युला-वन सर्किटवर इतकी शांतता का,’’ असा सवाल एका चाहत्याने विचारला. ‘‘लोकांना कानठळ्या बसणाऱ्या आवाजाची सवय झाली आहे, पण या मोसमात कारमध्ये बरेच बदल केले आहेत. चाहत्यांना रविवारी एका सुरेख वेगाची पर्वणी अनुभवता येईल, हे मात्र नक्की,’’ असे विल्यम्स संघाचे सहमालक क्लेअर विल्यम्स यांनी सांगितले.