गेल्या वर्षी केवळ एका ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर सेरेना विल्यम्सला समाधान मानावे लागले होते. यंदा ही कसर भरून काढण्याचा सेरेनाचा निर्धार आहे. वर्षांतल्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत आणखी एक दमदार विजय मिळवीत सेरेनाने तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले. सेरेनासह व्हिक्टोरिया अझारेन्का, नोव्हाक जोकोव्हिच, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांनी विजयी अभियान कायम राखले.
मेलबर्न पार्क परिसरात तळपत्या उन्हात अव्वल मानांकित सेरेनाने व्हेरा व्होनारोव्हाचा ७-५, ६-० असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये सेरेना अडखळत खेळत होती. बिनतोड सव्‍‌र्हिस आणि ताकदवान फोरहॅण्डच्या फटक्यांसह सेरेनाने पिछाडी भरून काढत पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या झंझावातासमोर व्होरानोव्हा निष्प्रभ ठरली.
दुखापती आणि कौटुंबिक आयुष्यातील चढउतारांमुळे कामगिरीत घसरण झाल्याने स्पर्धेसाठी मानांकनही न मिळू शकलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काने सरळ सेट्समध्ये विजय मिळवीत वर्चस्व सिद्ध केले. दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या अझारेन्काने कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-४, ६-२ असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने जर्मनीच्या मोना बार्थेलवर ६-२, ६-४ अशी मात केली. पुरुषांमध्ये अव्वल मानांकित जोकोव्हिचने सहज विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या पाचव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील जोकोव्हिचने आंद्रेय कुझनेतसोव्हचे आव्हान ६-०, ६-१, ६-४ असे संपुष्टात आणले.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. वॉवरिन्काने पात्रता फेरीतून दाखल झालेल्या मारिऑस कोपिलवर ७-६ (४), ७-६ (४), ६-३ अशी मात केली. वॉवरिन्काला प्रत्येक गुणासाठी झगडावे लागले.
जपानच्या केई निशिकोरीने इव्हान डोडिगवर ४-६, ७-५, ६-२, ७-६ (७-०) असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर निशिकोरीने चिवटपणे खेळ करीत आगेकूच केली. मिलोस राओनिकने डेव्हिड यंगवर ६-४, ७-६ (७-३), ६-३ अशी मात केली. डेव्हिड फेररने सर्जीय स्टॅथखोव्हस्की ५-७, ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.

बोपण्णाची आगेकूच
रोहन बोपण्णा आणि डॅनियल नेस्टर जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. दुसरीकडे जुर्गेन मेल्झरसह खेळणाऱ्या महेश भूपतीला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या मानांकित बोपण्णा-नेस्टर जोडीने मार्कोस बघदातीस-मारिन्को मॅटोसेव्हिक जोडीवर ७-६ (२), ७-५ असा विजय मिळवला. अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन आणि होरासिओ झेबालोस जोडीने भूपती-मेल्झर जोडीला ६-४, ६-३ असे नमवले.

Story img Loader