ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का बसला. जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने सेरेनेचा ६-४,३-६,६-४ अशा सेटसमध्ये पराभव केला. १९९९ नंतर ग्रॅंड स्लॅम जिंकणारी केर्बर ही पहिलीच जर्मन टेनिसपटू आहे.
या लढतीमध्ये सेरेनाचे पारडे जड होते. या लढतीतील विजयासह सेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातव्या आणि तिच्या कारकीर्दीतील २२ व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदावर कब्जा करणार असा अनेकांचा कयास होता. हे विजेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती. मात्र, अँजेलिक केर्बरने सेरेनाचे हे स्वप्न धुळीस मिळवले.
केर्बर ही प्रथमच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती. तिला या स्पर्धेत सातवे मानांकन होते. ग्रँड स्लॅमच्या पहिल्याच अंतिम फेरीचे दडपण न घेता केर्बरने पहिला सेट ३९ मिनिटांत जिंकला. त्यानंतर आपला खेळ उंचावत सेरेनाने दुसरा सेट जिंकला. मात्र, शेवटच्या सेटमध्ये केर्बरने पुन्हा एकदा हुकूमत राखली आणि पहिल्या-वहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली.

Story img Loader