मेलबर्न : सलग दोन वेळच्या उपविजेत्या डॅनिल मेदवेदेवचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. अमेरिकेच्या २९व्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाने सातव्या मानांकित मेदवेदेवला पराभवचा धक्का दिला. पुरुष एकेरीत तिसऱ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि महिला एकेरीत अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक यांनी आपापले सामने सहज जिंकत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
गतविजेता राफेल नदाल, द्वितीय मानांकित कॅस्पर रूड यांसारखे आघाडीचे खेळाडू आधीच्या फेरीत गारद झाल्याने मेदवेदेवला पहिल्या ऑस्ट्रेलियन जेतेपदासाठी संधी निर्माण झाली होती. मात्र, तिसऱ्या फेरीच्या लढतीत आपला सर्वोत्तम खेळ करण्यात मेदवेदेव अपयशी ठरला. अमेरिकेच्या कोर्डाने मेदवेदेवला ७-६ (९-७), ६-३, ७-६ (७-४) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्याचा पहिला आणि तिसरा सेट चुरशीचा झाला. मात्र, दोन्ही सेटच्या टायब्रेकरमध्ये कोर्डाने बाजी मारताना स्पर्धेत आगेकूच केली.
दुसरीकडे, ग्रीसच्या त्सित्सिपासने नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूरवर ६-२, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. सहाव्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेने अर्जेटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुंडोलोचा ६-१, ३-६, ६-१, ६-४ असा पराभव केला. १०व्या मानांकित हर्बर्ट हुरकाझने २०व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हला रंगतदार झालेल्या लढतीत ७-६ (७-३), ६-४, १-६, ४-६, ६-३ असे पराभूत केले.
कॅमेरुन नॉरीने जिरी लेहेश्काकडून ७-६ (१०-८), ३-६, ६-३, १-६, ४-६ अशी हार पत्करली.
महिलांमध्ये पोलंडच्या स्पेनच्या क्रिस्टिना बुकसाचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवताना विजयी घोडदौड कायम राखली. तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने युक्रेनच्या मार्टा कोस्तुयूकवर ६-०, ६-२ अशी, तर सातव्या मानांकित कोको गॉफने बेर्नार्डा पेरावर ६-३, ६-२ अशी सहज मात केली. २४व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने अमेरिकेच्या मॅडिसनला कीजला १-६, ६-२, ६-१ असे नमवले.
पुरुष दुहेरीत बोपण्णा पराभूत
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनच्या साथीने खेळणाऱ्या भारताच्या रोहन बोपण्णाने पुरुष दुहेरीतील पहिल्याच फेरीत बिगरमानांकित ऑस्ट्रियन जोडी लुकास मेडलर आणि अॅलेक्झांडर एर्लेरकडून ३-६, ५-७ अशी हार पत्करली.
पिछाडीनंतर मरे विजयी
दोन सेटची पिछाडी भरून काढत ब्रिटनच्या अँडी मरेने ऑस्ट्रेलियाच्या थानासि कोक्किनाकिसला ४-६, ६-७ (४-७), ७-६ (७-५), ६-३, ७-५ असे नमवत ऑस्ट्रेलियन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. हा सामना पाच तास ४५ मिनिटे चालला. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी हा सामना संपला. मरेच्या कारकीर्दीतील हा सर्वात दीर्घकाळ चाललेला सामना ठरला.