खाचानोव्हला पुढे चाल; महिलांत अझारेन्का, रायबाकिनाची आगेकूच

मेलबर्न : तिसऱ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने कमालीच्या ताकदीने खेळ करताना कारकीर्दीत चौथ्यांदा ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्सित्सिपासने जिरी लेहेकाचे आव्हान ६-३, ७-६ (७-२), ६-४ असे मोडून काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्सित्सिपासने पहिल्या सेटच्या सुरुवातीलाच सव्‍‌र्हिस तोडण्याची संधी साधताना लेहेकावर दडपण आणले. या दडपणाचा फायदा घेत त्सित्सिपासने पहिला सेट तीन गेमच्या फरकाने जिंकला.  लेहेकाने दुसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपाससमोर चांगले आव्हान उभे केले होते. मात्र, टायब्रेकमध्ये त्सित्सिपासने आपल्या सव्‍‌र्हिसच्या जोरावर बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये ४-५ अशा आघाडीवर असताना लेहेकाची सव्‍‌र्हिस तोडत त्सित्सिपासने विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत त्याची गाठ कारेन खाचानोव्हशी पडणार आहे. खाचानोव्हला सेबॅस्टियन कोर्डाने माघार घेतल्यामुळे पुढे चाल मिळाली. कोर्डाने माघार घेतली, तेव्हा खाचानोव्ह ७-६ (७-५), ६-३, ३-० असा आघाडीवर होता.

महिला एकेरीत २४व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-४, ६-१ असा पराभव केला. एलेना रायबाकिनाने येलेना ओस्टापेन्कोवर ६-२, ६-४ अशी मात केली.

मिर्झा-बोपण्णा उपांत्य फेरीत

रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा या भारताच्या अनुभवी जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत विनासायास प्रवेश केला. प्रतिस्पर्धी जेलेनो ओस्टापेन्को-डेव्हिड व्हेगा हर्नाडेझ जोडीने माघार घेतल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत मिर्झा-बोपण्णा जोडीला पुढे चाल मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2023 stefanos tsitsipas reaches semi finals for fourth time zws