एपी, मेलबर्न : दुसरा मानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

यासह पोलंडचा नववा मानांकित हबर्ट हुरकाझ आणि जर्मनीचा सहावा मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनाही आगेकूच करण्यात यश आले. महिला विभागात चीनची किनवेन झेंग, अ‍ॅना कलिनस्काया, बिगरमानांकित चेक प्रजासत्ताकची लिंडा नोस्कोवा आणि युक्रेनची दयाना यास्त्रेमस्का यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा >>> भारताला विजय अनिवार्य; आशिया चषक फुटबॉलमध्ये आज सीरियाशी सामना

अल्कराझने उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सर्बियाच्या मिओमिर केसमानोविचला ६-४, ६-४, ६-० अशा फरकाने पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत अल्कराझसमोर झ्वेरेव्हचे आव्हान असेल. झ्वेरव्हला आगेकूच करताना संघर्ष करावा लागला. त्याने पाच सेटपर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढतीत ब्रिटनच्या कॅमरून नॉरीला ७-५, ३-६, ६-३, ४-६, ७-६ (१०-३) असे नमवले.

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मेदवेदेवने पोर्तुगालच्या बिगरमानांकित नुनो बोजर्जेसला ६-३, ७-६ (७-४), ५-७, ६-१ असे पराभूत केले. हुरकाझने फ्रान्सच्या आर्थर काझाउक्सवर ७-६ (८-६), ७-६ (७-३), ६-४ असा विजय मिळवत आगेकूच केली.

महिलांमध्ये यास्त्रेमस्काने धक्कादायक निकाल नोंदवला. तिने दोन वेळच्या माजी विजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काचा ७-६ (८-६), ६-४ अशा फरकाने पराभव केला. चीनच्या झेंगने फ्रान्सच्या ओशियन डॉडिनवर ६-०, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. चौथ्या फेरीतील अन्य सामन्यात कलिनस्कायाने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीला ६-४, ६-२ असे पराभूत केले.

हेही वाचा >>> Glenn Maxwell : पब पार्टीत मॅक्सवेलची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केला तपास

बोपण्णा-एब्डेन विजयी

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन यांनी नेदरलँड्सच्या वेस्ली कूलहोफ व क्रोएशियाच्या निकोला मेक्टीचला ७-६ (१०-८), ७-६ (७-४) असे सरळ सेटमध्ये पराभूत करत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. या फेरीत त्यांच्यापुढे  अर्जेटिनाच्या मॅक्सिमो गोंझालेझ व आंद्रेस मोल्टेनी यांचे आव्हान असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यादरम्यान आंदोलकाचा गोंधळ

झ्वेरेव्ह आणि नॉरी यांच्यातील सामन्यादरम्यान आंदोलकाने कोर्टवर कागद फेकले. त्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीचा हा सामना थोडया वेळासाठी थांबवावा लागला. निळा शर्ट, टोपी आणि मुखपट्टी घातलेल्या एका व्यक्तीने युद्धविरोधी पत्रिका कोर्टवर फेकल्या. त्यावर ‘तुम्ही इथे टेनिस बघत बसले आहात आणि तिथे गाझावर बॉम्बहल्ले सुरू आहेत’ असा संदेश होता. कोर्टवरील ‘बॉल गर्ल’ने हे सर्व कागद गोळा केले व काही काळानंतर सामना पुन्हा सुरू झाला. सुरक्षारक्षकांनी या आंदोलकाला बाहेर काढले.