मेलबर्न : जवळपास दीड वर्षांनंतर एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान सोमवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. फ्रान्सच्या १६व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने ओसाकाला सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुरुष विभागात डॅनिल मेदवेदेव आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांनी आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली.
ओसाकाने गार्सियाला दोन्ही सेटमध्ये झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पूर्णपणे लयीत दिसली नाही. अखेरीस गार्सियाने या सामन्यात ६-४, ७-६ (७-२) अशी बाजी मारली.
हेही वाचा >>> Virat Kohli : ‘मी गेल्या काही वर्षांपासून विराटशी फक्त…’, जोकोविचने कोहलीबरोबरच्या मैत्रीवर दिली प्रतिक्रिया
तसेच गतवर्षी विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवलाही पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. वोन्ड्रोउसोवाला युक्रेनच्या दयामा यास्त्रेमस्का हिच्याकडून १-६, २-६ अशी हार पत्करावी लागली.
पुरुषांमध्ये तिसरा मानांकित मेदवेदेव आणि सातवा मानांकित त्सित्सिपास यांनी अपेक्षित सुरुवात केली. मेदवेदेवला बिगरमानांकित फ्रान्सच्या टेरेन्स अॅट्मानेविरुद्ध पुढे चाल मिळाली. मेदवेदेव ५-७, ६-२, ६-४, १-० असा आघाडीवर असताना टेरेन्सने दुखापतीमुळे माघार घेतली. त्सित्सिपासलाही पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करण्यात यश आले. त्सित्सिपासने बिगरमानांकित बेल्जियमच्या झिझू बग्र्सवर ५-७, ६-१, ६-१, ६-३ असा विजय मिळवला.
कोको गॉफची दमदार सुरुवात
चौथ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या अॅना कॅरोलिना श्मिडलोव्हाला ६-३, ६-० असे नमवले. गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या १९ वर्षीय गॉफसमोर दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्याच कॅरोलिन डोलहिडेचे आव्हान असेल. सहाव्या मानांकित ओन्स जाबेऊरनेही या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तिने युक्रेनच्या युलिया स्टारोदुबत्सेवाचा ६-३, ६-१ असा पराभव केला.