मेलबर्न : अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपली विजयी वाटचाल कायम राखताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तसेच, पुरुष गटात स्टेफानोस त्सित्सिपास व यानिक सिन्नेर यांनीही आपापल्या सामन्यात विजय नोंदवले. महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काने चमकदार कामगिरी करताना विजय नोंदवला. चौथ्या मानांकित अमेरिकेची कोको गॉफ, बिगरमानांकित युक्रेनची मार्टा कोस्तयुक यांनीही विजय मिळवत आगेकूच केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Danish Kaneria : ‘माझे रामलल्ला…’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या २४ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने अर्जेटिनाच्या टॉमस मार्टिन एचेवेरीला ६-३, ६-३, ७-६ (७-२) असे पराभूत केले. सामन्यातील पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये त्याच्यासमोर टॉमसचे  आव्हान उपस्थित केले. मात्र, जोकोविचने आपला खेळ उंचावत सेटसह सामना जिंकला. उपउपांत्यपूर्व फेरीत जोकोविचसमोर अ‍ॅड्रियन मनारिनोचे आव्हान असेल. अन्य सामन्यात, सातव्या मानांकित ग्रीसच्या त्सित्सिपासने फ्रान्सच्या लुका व्हॅन आसचेला ६-३, ६-०, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. तर, इटलीच्या सिन्नेरने अर्जेटिनाच्या सॅबेस्टियन बाएझवर ६-०, ६-१, ६-३ अशा फरकाने विजय नोंदवला. अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने हंगेरीच्या फॅबियन मारोझसानला ३-६, ६-४, ६-२, ६-२ असे नमवले.

महिला विभागात सबालेन्काने युक्रेनच्या लेसिया सुरेन्कोवर ६-०, ६-० असा एकतर्फी विजय नोंदवला. बेलारूसच्या सबालेन्काने एका वर्षांपूर्वी आपल्या कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले होते. तिला सामना जिंकण्यासाठी केवळ ५२ मिनिटे लागली. आता सबालेन्काचा सामना पुढच्या फेरीत अमांडा एनिसिमोवाशी होणार आहे. अन्य सामन्यात, जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक गॉफने अमेरिकेच्या अ‍ॅलिसिया पार्क्‍सला ६-०, ६-२ असे सहज नमवले. तर, कोस्तयुकने एलिना अवानेस्यानवर २-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. सामन्याचा पहिला सेट गमावूनही कोस्तयुकने पुनरागमन करताना सलग दोन सेट जिंकले. बिगरमानांकित मारिया टिमोफीव्हाने दहाव्या मानांकित ब्राझीलच्या बिअट्रिझ हद्दाद माइआला ७-६ (९-७), ६-३ अशा फरकाने नमवित धक्कादायक निकाल नोंदवला.

हेही वाचा >>> NZ vs PAK : मिचेल सँटनरनंतर न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, चौथ्या टी-२० सामन्यातून पडला बाहेर

बोपण्णा, बालाजी दुहेरीत विजयी भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन या दुसऱ्या मानांकित जोडीला पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. बोपण्णा व एब्डेन जोडीने जॉन मिलमन व एडवर्ड विंटर या स्थानिक जोडीला एक तासाहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात ६-२, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. त्यापूर्वी श्रीराम बालाजी व त्याचा रोमानियाचा साथीदार विक्टर व्लाड कॉर्निया यांच्या जोडीने इटलीच्या मात्तेओ अर्नाल्डी व आंद्रिया पेलेग्रिनो जोडीला ६-३, ६-४ असे नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2024 novak djokovic aryna sabalenka advance into fourth round zws
Show comments