Australian Open 2024, Summit Nagal: भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचत मोठी कामगिरी केली आहे. त्याने अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत मोठा अपसेट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. अलेक्झांडरचे या स्पर्धेत ३१वे मानांकन होते. त्याचा पराभव करत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमित नागल २०१३ नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. सोमदेव देवबर्मनने २०१३ मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात अग्रमानांकित खेळाडूचा पराभव केला आहे. रमेश कृष्णन यांनी १९८९ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांनी स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला. विलँडर त्यावेळी टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होते.

सुमितने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची मुख्य फेरी जिंकली आहे. याआधी २०२०च्या यू.एस. ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल १०० मध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला त्याने सातव्यांदा पराभूत केले आहे. त्याचबरोबर विरोधी खेळाडूच्या क्रमवारीत सुमितचा हा दुसरा मोठा विजय आहे.

काय घडलं सामन्यामध्ये?

सुमितने शानदार सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने तीन वेळा अलेक्झांडरची सर्व्हिस तोडली आणि पहिला सेट ६-४ अशा फरकाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. अलेक्झांडर बुब्लिकनेही काही चुका केल्या आणि त्याचा फायदा घेत नागलने दुसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. दोन सेट जिंकल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची लढत झाली आणि टायब्रेकमध्ये नागलने बाजी मारली. त्याने हा सेट ७-६ असा जिंकला आणि सामना आपल्या नावावर केला. त्याच्यावर सर्व स्तरतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: Shivam Dube: धोनीच्या छोट्या सल्ल्याने शिवम दुबेची कारकीर्द बदलली, शॉर्ट बॉलबद्दल म्हणाला, “रॉकेट सायन्स नाही पण…”

मरे आणि वॉवरिंका स्पर्धेतून बाहेर

पाच वेळचा उपविजेता अँडी मरे आणि २०१४चा चॅम्पियन स्टॅन वॉवरिंका यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चमकदार कामगिरी केली होती, परंतु या दोन्ही अनुभवी जोडीचा सोमवारी पहिल्या फेरीत पराभव झाला. मरेला अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टिन एचेव्हरीकडून ६–४, ६–२, ६–२ असा पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी वॉवरिंकाला २०व्या मानांकित अ‍ॅड्रियन मॅनारिनोने पराभूत केले. मॅनारिनोने हा सामना ६–४, ३-६, ५-७, ६-७, ६-० असा जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2024 sumit nagal made a big upset in the australian open the first indian to do so since 1989 avw