Australian Open 2025 Madison Keys Hugs Husband Cum Coach After Winning: ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरीचा किताब अमेरिकन टेनिसपटू मॅडिसन की हिने जिंकला. अंतिम सामन्यात मॅडिसन कीने महिला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू एरिना साबालेन्का हिला पराभूत करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात सबालेन्का विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती पण अमेरिकन खेळाडू मॅडिसनने मोठा अपसेट करत तीन सेटमध्ये विजेतेपद पटकावले. या सामन्यात साबालेन्काने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले, मात्र मॅडिसनने तिसरा आणि निर्णायक सेट जिंकून कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरी ग्रँड स्लॅम फायनलमध्ये मॅडिसन कीज आणि एरिना सबालेन्का यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. मॅडिसनने पहिला सेट ६-३ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये एरिना सबलेन्काने ६-२ ने जिंकत शानदार पुनरागमन केले. आता सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर सर्व चाहत्यांच्या नजरा तिसऱ्या आणि निर्णायक सेटवर खिळल्या होत्या, ज्यात मॅडिसनने पुनरागमन करत हा थरारक सेट ७-५ असा जिंकला आणि सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे एरिना सबालेन्काचे स्वप्न धुळीस मिळवले. सबालेन्का जर जिंकण्यात यशस्वी ठरली असती तर मेलबर्न पार्कवर सलग तीन वेळा हे विजेतेपद पटकावणारी मार्टिना हिंगीसनंतरची ती पहिली महिला खेळाडू ठरली असती.

मॅडिसनने पहिल्याच ग्रँडस्लॅम विजेतेपदानंतर तिने प्रशिक्षक असलेल्या तिच्या नवऱ्याला मिठी मारत ढसाढसा रडताना दिसली. नोव्हेंबरमध्ये मॅडिसनने प्रशिक्षक असलेला नवरा फ्रॅटेंगेलोशी विवाह केला. मॅडिसनने विजयानंतर सांगितलं की, मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा ग्रँडस्लॅम फायनल खेळत जिंकू शकेन पण माझ्या टीमला माझ्यावर खूप विश्वास होता, जेव्हा मी स्वत: माझ्यावर विश्वास ठेवू शकली नाही तेव्हा माझी टीम माझ्यापाठीशी भक्कमपणे उभी होती.

अमेरिकेची १९वी सीडेड खेळाडू मॅडिसन कीने आपल्या टेनिस कारकिर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे. मॅडिसन कीने २०१७ मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, जिथे तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता दुसऱ्यांदा, ती ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली. जिथे तिने विजेतेपदही पटकावले.

आता सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या फायनलकडे आहे, जो २६ जानेवारी रोजी मेलबर्न पार्क येथे यानिक सिनर आणि झ्वेरेव्ह यांच्यात खेळला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2025 madison keys stuns aryna sabalenka to win her first grand slam title hugs husband cum coach video bdg