मेलबर्न : जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या यानिक सिन्नेर, नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराझ या तारांकितांनी ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी अपेक्षित विजयी सलामी दिली. जोकोविचने भारतीय वंशाच्या निशेष बसवरेड्डीवर मिळवलेला विजय लक्षवेधी ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिष्ठित स्टॅनफर्ड विद्यापीठातील शिक्षण सोडून व्यावसायिक टेनिसकडे वळलेल्या अमेरिकेच्या १९ वर्षीय निशेषने जोकोविचला कडवी झुंज दिली. त्याने पहिला सेटही जिंकला. मात्र त्यानंतर २४ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावताना निशेषचे आव्हान परतवून लावले.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील ११वे जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जोकोविचने ही लढत ४-६, ६-३, ६-४, ६-२ अशी जिंकली. त्याने या लढतीत २३ बिनतोड सर्व्हिस केल्या. गतविजेत्या यानिक सिन्नेरलाही पहिल्या फेरीत विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागला. त्याने सलामीची लढत सरळ तीन सेटमध्ये जिंकली, पण यापैकी दोन सेट टायब्रेकरमध्ये गेले. सिन्नेरने चिलीच्या निकोलस जॅरीवर ७-६ (७-२), ७-५ (७-५), ६-१ अशी सरशी साधली. तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अॅलेक्झांडर शेवचेंकोला ६-१, ७-५, ६-१ असे पराभूत केले.

महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित इगा श्वीऑटेक आणि तिसऱ्या मानांकित कोको गॉफने विजयी सुरुवात केली. श्वीऑटेकने कॅटरिना सिनिआकोवाला ६-३, ६-४ असे नमवले. कोकोने अमेरिकेच्याच सोफिया केनिनचा ६-३, ६-३ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy zws