सेरेना विल्यम्सने वयाच्या ३३व्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या जेतेपदाला गवसणी घालताना ‘अजुनी यौवनात मी..’ हे बोल सार्थ ठरवले. टेनिस हा केवळ तरुणांचा खेळ नाही. अनुभवापुढे गुणवान खेळाडूंची मात्रा नेहमीच यशस्वी ठरत नाही, याचा प्रत्यय सेरेनाने शनिवारी अंतिम सामन्यात घडवला. अंतिम लढतीत तिने रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचे आव्हान ६-३, ७-६ (७-५) अशा फरकाने मोडीत काढले आणि टेनिसजगताचे लक्ष वेधून घेतले.
दोन रणरागिणींमधील ही लढत कोण जिंकणार, ही उत्कंठा दुसऱ्या सेटमध्ये शिगेला गेली होती. मात्र ताकदवान खेळापुढे कलात्मक खेळाला मर्यादा आल्या. सेरेनाने अपेक्षांची पूर्तता करताना कारकीर्दीतील १९व्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले आणि त्यानंतर पारितोषिक स्वीकारताना ती आपली भावनिकता लपवू शकली नाही. सेरेनाचे हे सहावे ऑस्ट्रेलियन जेतेपद ठरले. खुल्या स्पर्धाच्या युगात विजेतेपद मिळवणारी ती सर्वात प्रौढ खेळाडू ठरली आहे. स्टेफी ग्राफच्या नावावर एकेरीतील २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदे आहेत.
सेरेनाने या लढतीपूर्वी सलग १५ लढतींमध्ये शारापोव्हाला हरवले होते. याचेच दडपण शारापोव्हावर प्रारंभापासूनच जाणवत होते. पहिल्याच गेममध्ये तिने दुहेरी चुका करीत खराब सुरुवात केली. तेथूनच सेरेनाने खेळावर नियंत्रण मिळवले. तिने जमिनीलगत खणखणीत फटक्यांचा बहारदार खेळ केला. पहिल्या सेटमध्ये ३-२ अशी सेरेनाकडे आघाडी असताना पावसाचा व्यत्यय आला. या वेळी सेरेना ही शांतपणे बसून राहिली होती. शारापोव्हा ही अधूनमधून पूरक व्यायाम करीत होती. यावरूनच तिच्यावरील दडपण स्पष्टपणे दिसत होते.
पाऊस थांबल्यानंतर खेळ पूर्ववत झाल्यानंतर सेरेनाने बिनतोड सव्र्हिस करीत आपल्या खेळातील लय बिघडलेली नाही, हेच दाखवून दिले. या संपूर्ण सामन्यात तिने १८ वेळा बिनतोड सव्र्हिस केल्या. तिने सरासरी ताशी २०३ किलोमीटर वेगाने झंझावाती सव्र्हिस केल्या. तिच्या वेगवान खेळापुढे शारापोव्हा अनेक वेळा निष्प्रभ झाली. दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत शारापोव्हाने झुंज दिली. विजयानंतर सेरेनाच्या आनंदाला पारावार नव्हता. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ या उक्तीला साजेशा असंख्य उंच उडय़ा घेत तिने टेनिसरसिकांना अभिवादन केले.
अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला, त्या वेळी मला अस्वस्थ वाटत होते. क्षणभर उलटी होण्याची भीती मला वाटत होती. मात्र हे विजेतेपद आपले आहे अशी मनाशी खूणगाठ ठेवत खेळले. हे विजेतेपद माझ्यासाठी खूपच संस्मरणीय आहे. शारापोव्हाने दिलेल्या लढतीमुळेच मला सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळाली. तिने या सामन्यात रंगत निर्माण करीत प्रेक्षकांना खेळाचा खरा आनंद मिळवून दिला.
-सेरेना विल्यम्स
सेरेनाने केलेला आक्रमक खेळ पाहता ती ३३ वर्षीय खेळाडू आहे, हे कुणालाही खरे वाटणार नाही. तिच्या खेळात जबरदस्त आत्मविश्वास व ताकद होती. तिने केलेल्या अनेक सव्र्हिस मला आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. विजेतेपद मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र मी त्यासाठी अपेक्षेइतका अव्वल खेळ करू शकले नाही.
-मारिया शारापोव्हा
पेस-हिंगीस जेतेपदासाठी उत्सुक
मेलबर्न : मेलबर्न पार्कवर भारताचा लिएण्डर पेस स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅमच्या रूपाने वर्षांतील पहिले जेतेपद काबीज करण्यासाठी उत्सुक आहे. ४१ वर्षीय पेस आणि ३४ वर्षीय हिंगीस या दोघांच्या टेनिस कारकीर्दीतील हे १५वे विजेतेपद असणार आहे. पेस-हिंगीसची मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत क्रिस्तियाना म्लादेनोव्हिक (फ्रान्स) आणि डॅनियल नेस्टर (कॅनडा) यांच्याशी गाठ पडणार आहे.