पीटीआय, सिडनी
भारताच्या एचएस प्रणॉयला रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग हाँग यांगकडून तीन गेमपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे प्रणॉयला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.केरळच्या या ३१ वर्षीय प्रणॉयने पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करत सामना तिसऱ्या गेमपर्यंत खेचला. मात्र, निर्णायक गेममध्ये पाच गुणांच्या आघाडीचा फायदा त्याला घेता आला नाही आणि जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असणाऱ्या वेंगकडून ९-२१, २३-२१, २०-२२ अशा पराभवाचा सामना करावा लागला. कोरियन खुली बॅडमिंटन स्पर्धा (२०२२) आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे (२०१९) जेतेपद मिळवणारा यांग व प्रणॉय यांमध्ये केवळ एकदाच सामना झाला होता. त्या सामन्यात प्रणॉयने तीन गेममध्ये विजय मिळवताना मलेशियन मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. प्रणॉयने या सत्रातील आठपैकी सहा सामन्यांत सुरुवातीचा गेम गमावल्यानंतर विजय नोंदवला आहे. प्रणॉयने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अँथनी गिंटिंगविरुद्ध पिछाडीनंतर विजय साकारला होता.
पहिला गेम गमावल्यानंतर जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या प्रणॉयकडे निर्णायक गेममध्ये १९-१४ अशी पाच गुणांची आघाडी होती, मात्र वेंगने जोरदार खेळ करत सामन्यात विजय नोंदवला. प्रणॉयने सामन्याला चांगली सुरुवात केली; पण वेंगने सामना ६-६ असा बरोबरीत आणला. यानंतर चीनच्या खेळाडूने सलग १२ गुण मिळवत वर्चस्व निर्माण केले व प्रणॉयला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. पहिला गेम मोठय़ा फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या गेमच्या सुरुवातीलाही प्रणॉय ०-३ असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने पुनरागमन करताना गेम ७-७ असा बरोबरीत आणला. गेमच्या मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर चीनच्या खेळाडूने गुण मिळवत गेममध्ये १५-१५ अशी बरोबरी साधली. प्रणॉयने खेळ उंचावत गेम २१-२१ असा बरोबरीत आणला. यानंतर प्रणॉयने सलग दोन गुण मिळवत गेम जिंकला.
प्रणॉयने तिसऱ्या गेममध्ये आपली हीच लय कायम राखताना ६-३ अशी आघाडी मिळवली. वेंगच्या चुकांचा फायदा घेत प्रणॉय १५-९ अशा भक्कम स्थितीत पोहोचला. यानंतर चीनच्या खेळाडूने गुण मिळवत आघाडी कमी केली. मात्र, प्रणॉयने चांगला खेळ करत १९-१४ अशी मजबूत आघाडी घेतली. यानंतर वेंगने सलग गुणांची कमाई करताना गेम १९-१९ असा बरोबरीत आणला. प्रणॉयने नेटच्या जवळ चांगला खेळ करताना गुण मिळवण्याची संधी निर्माण केली. मात्र, नशिबाची साथ वेंगला मिळाली. वेंगने यानंतर निर्णायक गुण मिळवत गेमसह सामना जिंकला.