सिडनी : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने शनिवारी प्रियांशू राजावतला सरळ गेममध्ये नमवत ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर ५०० दर्जा) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या प्रणॉयने २१ वर्षीय राजावतला ४३ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१८, २१-१२ असे पराभूत केले.
ऑर्लिन्स मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या राजावतने प्रथमच सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्याने सामन्यातील पहिल्या गेममध्ये चांगली कामगिरी केली व सहाव्या मानांकित प्रणॉयसमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, या वर्षी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या प्रणॉयने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसरा गेम सहज जिंकत सामन्यात विजय नोंदवला. अंतिम फेरीत त्याच्यासमोर चीनच्या वेंग होंग यांगचे आव्हान असेल. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या वेंगला नमवतच मलेशिया मास्टर्स स्पर्धेचा किताब मिळवला होता. उपांत्यपूर्व सामन्यात प्रणॉयने दुसऱ्या मानांकित अँथनी गिंटिंगला ७३ मिनिटे चाललेल्या सामन्यात नमवले होते.