गतवर्षीच्या आठवणी बाजूला ठेऊन नवीन वर्षांला नवी उर्जा, उत्साह यासह सामोरे जाण्याची स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा. वर्षांतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी सर्वच अव्वल खेळाडू उत्सुक आहेत. यापैकी काहींनी सोमवारी आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. मेलबर्नमध्ये अतिशय उष्ण वातावरणात गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच, पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी आतुर डेव्हिड फेरर, टॉमस बर्डीच यांनी विजयी सलामी दिली. महिलांमध्ये जेतेपदाची प्रबळ दावेदार सेरेना विल्यमसह चीनची लि ना, जर्मनीची अँजेलिक्यू कर्बर यांच्यासह समंथा स्टोसूर, अ‍ॅना इव्हानोव्हिक यांनी विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. मात्र व्हीनस विल्यम्सला सलामीच्या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
कारकिर्दीतील ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सहावे तर एकूण १८वे ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी सक्षम दावेदार असणाऱ्या सेरेना विल्यम्सने दमदार विजय मिळवत श्रीगणेशा केला. तिशीत असलेल्या सेरेनाने काही दिवसांपूर्वीच झालेल्या ब्रिस्बेन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत या स्पर्धेसाठी तयार असल्याचे सिद्ध केले होते. सलामीच्या लढतीत अ‍ॅशलेह बार्टीवर ६-२, ६-१ अशी सहज मात करत सेरेनाने आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे. एकीकडे सेरेना फॉर्मात असताना दुसरीकडे तिची बहीण आणि अव्वल खेळाडू व्हीनस विल्यम्स सलामीच्या लढतीतच पराभूत झाली. सात ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या मात्र गेले काही वर्ष फॉर्म आणि दुखापतींशी झगडणाऱ्या व्हीनसला रशियाच्या २२व्या मानांकित इकाटेरिना माकारोव्हाने नमवले. तिने हा सामना २-६, ६-४, ६-४ असा जिंकला. गेल्या वर्षी ११ स्पर्धामध्ये सहभागी होऊन तसेच यापैकी तीन स्पर्धाच्या उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारल्यानंतरही ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत व्हीनसला मानांकन देण्यात आले नव्हते. मात्र तरीही व्हीनसने पहिला सेट जिंकत पायाभरणी केली मात्र त्यानंतर टाळत्या येण्यासारख्या चुका तसेच महत्त्वाच्या क्षणी ब्रेकपॉइंट गमावल्याचा फटका व्हीनसला बसला. २००८ नंतर व्हीनसला ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. ऑक्टोबर २०१२ मध्ये लक्सेंबर्ग येथे झालेल्या स्पर्धेतील जेतेपदानंतर तिला एकाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. या पराभवामुळे व्हीनसचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न लांबणीवर गेले आहे.
हार्डकोर्टवर रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत दोनदा मजल मारुनही लि नाला जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारता आले नाही. यावेळी जेतेपदाचा निर्धार पक्का केलेल्या लि नाने क्रोएशियाच्या १६ वर्षीय अना कोनजुआहचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. पुढील फेरीत तिची लढत स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेनकिकशी होणार आहे. सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकने नेदरलँण्ड्सच्या किकी बर्टन्सचा ६-४, ६-४ असा पराभव केला. पुढच्या फेरीत तिचा मुकाबला एकाटेरिना माकारोव्हाशी होणार आहे. जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरने ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गाजडोसोव्हावर ६-३, ०-६, ६-२ अशी मात केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या समंथा स्टोसूरने चेक प्रजासत्ताकच्या क्लॅरा झाकोपालोव्हावर ६-३, ६-४ असा विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे सलग चौथे जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक नोव्हाक जोकोव्हिचने महान खेळाडू बोरिस बेकरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना विजयी सलामी दिली. जोकोव्हिचने स्लोव्हाकियाच्या ल्युकास लाकोवर ६-३, ७-६(७-२), ६-१ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. बऱ्याच कालावधीनंतर कोर्टवर उतरलेल्या जोकोव्हिचच्या खेळात नेहमीचे वर्चस्व जाणवले नाही परंतु त्याने विजय मिळवला. पुढच्या फेरीत त्याची लढत अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयरशी होणार आहे. स्पेनच्या डेव्हिड फेररने अलेजँड्रो गोनालेझला ६-३, ६-४, ६-४ असे नमवले. टॉमस बर्डीचने अलेक्झांडर नेडोव्येसव्हवर ६-३, ६-४, ६-३ अशी मात केली.

Story img Loader