रोमांचक, थरारक आणि कधीही न विसरता येणारा टेनिस सामना आज प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये अनुभवायला मिळाला. स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला हरवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. तब्बल साडेपाच तास रंगलेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवची झुंज मोडून काढत २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. या विजेतेपदासह नदालच्या खात्यात आता सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला. टेनिसमधील रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने शानदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. उपांत्य फेरीतील जबरदस्त विजयानंतर मेदवेदेव अंतिम सामन्यातही उत्कृष्ट लयीत दिसला. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालपेक्षा सरस खेळ केला. सामन्याच्या सुरुवातीपासून नदालकडे मेदवेदेवच्या सर्व्हिसचे उत्तर नव्हते.

हेही वाचा – शांत पण भेदक नजर..! विराटची स्पर्धा कोणाशी? फोटो शेअर करत त्यानंच दिलं उत्तर; एकदा वाचाच!

पहिला सेट सहज जिंकल्यानंतर मेदवेदेवला दुसरा सेट जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या सेटमध्ये नदालने चांगली सुरुवात केली होती आणि तो मेदवेदेवच्या पुढे होता. मात्र, नंतर रशियन खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि ६-६ अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या मिनिटात त्याने शानदार खेळ करत दुसरा सेट ७-६ असा जिंकला.

नदालचे धमाकेदार कमबॅक!

तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव नदालला पुन्हा मागे टाकेल, असे वाटत होते. पण नदालने आपल्या अनुभवाचा पुरेपुर वापर करत खेळात नियंत्रण राखले. त्याने या सेटमध्ये जास्त चुका न करता हा सेट ६-४ असा नावावर केला. पुढच्या सेटमध्येही नदालने चपळता आणि जोरकस फटक्यांचा वापर केला. मेदवेदेव अधूनमधून गुण घेत राहिला, पण आत्मविश्वास उंचावलेल्या नदालने चौथा सेटही ६-४ असा जिंकला.

पाचव्या सेटमध्ये थकवा आणि शारिरीक दुखापतींमुळे मेदवेदेव थोडा बॅकफूटवर गेला. अप्रतिम ड्रॉप शॉट आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर नदालने मेदवेदेवला झुंजवले. मेदवेदेवनेही प्रतिकार केला आणि सामना ५-५ अशा स्थितीत पोहोचवला. पण नदालने एकापाठोपाठ गुण घेत पाचवा सेट ७-५ असा जिंकत विजय नावावर केला.

महिला दुहेरीत कतरिना आणि बार्बोरा या जोडीने विजेतेपद पटकावले आहे. महिला एकेरी गटात अ‍ॅश्ले बार्टीने विजेतेपद पटकावले.

Story img Loader