अंगाची काहिली करणाऱ्या मेलबर्नच्या तप्त वातावरणात रॉजर फेडररने ज्येष्ठ खेळाडू स्टीफन एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी श्रीगणेशा केला. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या अँडी मरे, राफेल नदाल यांनीही आपापल्या लढती जिंकत यशस्वी सुरुवात केली. महिलांमध्ये सेरेनाच्या बरोबरीने जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्का, मारिया शारापोव्हा यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
तब्बल १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररसाठी २०१३ वर्ष दु:स्वप्न ठरले. एकाही ग्रँड स्लॅम जेतेपदावर त्याला नाव कोरता आले नाही. याव्यतिरिक्त एटीपी दर्जाच्या जेमतेम दोन जेतेपदांची त्याने कमाई केली. या सुमार प्रदर्शनामुळे फेडररच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र फेडररने याचा इन्कार करत २०१४ मध्येही खेळणार असल्याचे स्पष्ट केले. विजयपथावर परतण्यासाठी फेडररने आपल्या प्रशिक्षकांच्या चमूत स्टीफन एडबर्गला समाविष्ट केले. एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखालीच फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. सहाव्या मानांकित फेडररने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ६-४, ६-४, ६-२ असा पराभव केला. यंदाची ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा फेडरर सहभागी होत असलेली ५७वी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. उष्ण वातावरणाचा खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता फेडररने सफाईदार विजय मिळवला. ज्यांना पाहून टेनिस खेळायची प्रेरणा मिळायची, त्या एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे हा सन्मान असल्याचे फेडररने सांगितले.
अँडी मरेला तीन वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. हा इतिहास बदलण्याची मरेला चांगली संधी आहे. त्या दृष्टीने पहिल्या लढतीत जपानच्या गो सोइडावर ६-१, ६-१,
६-३ अशी सहज मात करत त्याने आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली.
गेल्या वर्षी गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या राफेल नदालला सलामीच्या लढतीत विजयी घोषित करण्यात आले. राफेल नदालने पहिला सेट ६-४ असा जिंकला होता. त्या वेळी प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा बरनॉर्ड टॉमिकने दुखापतीमुळे माघार घेतली. अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने अमेरिकेच्या ऱ्हाइन विल्यम्सवर ६-७, ६-३, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.
सलग तिसऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासाठी आतूर असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काला पहिल्या लढतीत विजयासाठी झगडावे लागले. द्वितीय मानांकित अझारेन्काने जागतिक क्रमवारीत ९१व्या स्थानी असलेल्या जोहाना लार्सनचा ७-६ (७-२), ६-२ असा पराभव केला. टाळता येण्यासारख्या चुका, सदोष सव्र्हिस आणि प्रचंड तप्त वातावरण यामुळे अझारेन्काला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शारापोव्हाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक सँण्ड्सला ६-३, ६-४ असे पराभूत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा