जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान सहजासहजी मिळत नसते, तर त्यासाठी झगडावे लागते. या दर्जाला साजेशा खेळाचा प्रत्यय घडवत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने गतविजेत्या स्टॅनिस्लास वॉवरिन्काला हरवले आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात त्याला इंग्लंडच्या अँडी मरेच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत वॉवरिन्कावर ७-६ (७-१), ३-६, ६-४, ४-६, ६-० असा रोमहर्षक विजय मिळविला.
विजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे अवघड असते, हे वॉवरिन्काला कळून चुकले असेल. गतवर्षी त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या जेतेपदाला गवसणी घालताना सनसनाटी कामगिरी केली होती. त्या वेळी त्याने जोकोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीतच माघारी पाठवले होते. या पराभवाची परतफेड करताना जोकोव्हिचने ठेवणीतील अस्त्रांचा उपयोग केला. पावणेचार तास चाललेल्या या लढतीद्वारे चाहत्यांना टेनिसचा भरपूर आनंद घेण्याची संधी मिळाली. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या पासिंग शॉट्स, नेटजवळून प्लेसिंग व बेसलाइन व्हॉलीज अशा चतुरस्र खेळामुळे हा सामना खूपच चुरशीने खेळला गेला. जोकोव्हिचने या स्पर्धेत आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. त्याखेरीज त्याने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धाची आणखी तीन विजेतेपदे मिळवली आहेत.
शारापोव्हा-सेरेनामध्ये अंतिम फेरी
एकीकडे ताकदवान खेळ, तर दुसरीकडे कलात्मक खेळ यांच्यातील महामुकाबल्यात श्रेष्ठ कोण ठरणार शनिवारी सिद्ध होईल. सेरेना विल्यम्स व मारिया शारापोव्हा या दोन रणरागिणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. द्वितीय मानांकित शारापोव्हापेक्षा अग्रमानांकित सेरेनाचे पारडे जड मानले जात आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आतापर्यंत १८ अजिंक्यपदे मिळवणाऱ्या सेरेनाला विजेतेपदाची अधिक संधी असली तरी उपांत्य फेरीत तिला अमेरिकेच्याच मॅडीसन की हिने झगडायला लावले होते. हीच शारापोव्हासाठी मानसिक धैर्य उंचावणारी गोष्ट आहे. जागतिक टेनिस क्षेत्रातील सध्याच्या घडीच्या या दोन अव्वल खेळाडूंमध्ये होणारी अंतिम लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. सेरेनाने आतापर्यंत शारापोव्हाविरुद्ध झालेल्या १८ सामन्यांपैकी १६ सामने जिंकले आहेत, त्यापैकी तिने गेल्या १५ सामन्यांमध्ये शारापोव्हाला विजय मिळवण्यापासून वंचित ठेवले आहे.

Story img Loader