ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी मातब्बर प्रतिस्पध्र्यामध्ये कडवा प्रतिकार पाहायला मिळतो. मात्र ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा या वर्षांतल्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत खेळाडूंना प्रतिकूल हवामानाशी झुंज द्यावी लागत आहे. मेलबर्नमध्ये पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने विजय मिळवण्यासाठी खेळाडूंना अक्षरक्ष: घाम गाळावा लागत आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे खेळाडूंना चक्कर येणे, उलटी, थकवा, पायात गोळे येणे, यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बर्फाची पिशवी आणि ऊर्जावर्धक पेय यांच्या आधारावरच खेळाडूंची वाटचाल सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे विविध व्याधींनी हैराण झालेल्या खेळाडूंना माघारीचा मार्ग पत्करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. आतापर्यंत तब्बल दहा खेळाडूंनी दुखापती आणि अतिउष्ण हवामानामुळे माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत खेळाडूंनी माघार घेत एक नवा विक्रम नोंदवला आहे. दरम्यान, जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. चीनच्या लि ना, ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर, स्वित्र्झलडचा स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी झुंजार विजय मिळवत तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले.
आवडत्या हार्डकोर्टवर सलग चौथे जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयरला ६-०, ६-४, ६-४ असे सहज नमवत तिसरी फेरी गाठली. २०१०नंतर या स्पर्धेत अपराजित असलेला द्वितीय मानांकित जोकोव्हिच उष्ण वातावरणामुळे त्रस्त होता. मात्र अतिउष्ण वातावरणाचा त्याने आपल्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. रॉय इमर्सन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सलग चौथे आणि एकूण पाचवे जेतेपद पटकावण्यासाठी तो उत्सुक आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सेरेनाने सर्बियाच्या वेसना डोलनकचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. चीनच्या लि ना हिने स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेनसिकचा ६-०, ७-६(७-५) असा पराभव ला. अ‍ॅना इव्हानोव्हिकने जर्मनीच्या अनिका बेकवर ६-१, ६-२ अशी मात करत तिसरी फेरी गाठली. अन्य लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने बल्गेरियाच्या स्वेताना पिरोंकोव्हाचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. अन्य लढतींमध्ये चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचने फ्रान्सच्या केनी डि शीपरचा ६-४, ६-१, ६-३ असा पराभव केला. स्पेनच्या डेव्हिड फेररने फ्रान्सच्या एड्रियन मनारिओवर ७-६(२), ५-७, ६-०, ६-३ अशी मात केली. स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने कोलंबियाच्या अलेजॅन्ड्रो फलावर ६-३, ६-३, ६-७(४), ६-४ असा विजय मिळवला.

युकी, महेशची विजयी सलामी
मेलबर्न : युकी भांबरी आणि महेश भूपती यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना विजयी सलामी दिली. मात्र दिविज शरणला पराभवाला सामोरे जावे लागले. युकी-मायकेल व्हीनस जोडीने सलामीच्या लढतीत स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा ऑगट आणि डॅनियल जिमेनो-ट्रेव्हर जोडीवर ६-२, ७-५ असा विजय मिळवला. भूपती-राजीव राम जोडीने सँटिआगो गिराल्डो आणि पोर्तुगालच्या जाओ सौसा जोडीला ४-६, ६-३, ६-४ असे नमवले.