जेतेपदाची ती प्रबळ दावेदार आहे, तिचा प्रत्येक सामना आणि त्यातला विजय नवनवीन विक्रमांची नोंद करतो आहे. सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतल्या विक्रमी ६१व्या विजयाची नोंद करत दिमाखात चौथ्या फेरीत स्थान पटकावले. सेरेनाच्या साथीने लि ना, अॅना इव्हानोव्हिक, अँजेलिक्यू कर्बर यांनीही चौथ्या फेरीत आगेकूच केली. पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने आणखी एक सहज विजय मिळवत जेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल केली.
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे चौथे जेतेपद पटकावण्यासाठी आतुर नोव्हाक जोकोव्हिचने आणखी एक सहज विजय मिळवत विजयरथ पुढे रेटला. डेव्हिड फेरर, टॉमस बर्डीच यांनीही आगेकूच करत चौथ्या फेरीत स्थान पटकावले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सेरेनाने स्लोव्हाकियाच्या अनुभवी डॅनियला हन्तुचोव्हावर ६-३, ६-३ अशी मात करत चौथी फेरी गाठली. ताकदवान सव्र्हिसचा प्रभावी उपयोग करत सेरेनाने विजय मिळवला. कारकिर्दीतील अठराव्या ग्रँड स्लॅम तर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदाच्या दिशेने सेरेनाने आणखी एक दमदार पाऊल टाकले. पुढील फेरीत सेरेनाचा मुकाबला अॅना इव्हानोव्हिकशी होणार आहे.
डॅनियला अनुभवी खेळाडू आहे. तिच्याविरुद्धची लढत कठीण होती. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवल्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आजही वातावरण तप्त होते, खेळायला अडचणीचे होते. परंतु त्याला पर्याय नाही. अशा परिस्थितीत खेळण्याची मानसिक तयारी करायला हवी. या विजयाने आत्मविश्वास उंचावला आहे. या विजयासह सेरेनाने मार्गारेट कोर्ट यांच्या या स्पर्धेतील ६० विजयांचा विक्रम मागे टाकला.
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रयत्नात असणाऱ्या चीनच्या लि नाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. लि नाने चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी साफ्रोव्हाचा १-६, ७-६ (७-२), ६-३ असा पराभव केला. चौथ्या मानांकित लि नाने पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर जिद्दीने खेळ करत तिने पुढच्या दोन्ही सेटवर कब्जा करत रोमहर्षक मुकाबला जिंकला. पुढच्या फेरीत तिची लढत रशियाच्या २२व्या मानांकित एकाटेरिना माकारोव्हाशी होणार आहे. प्रचंड उष्णतेचा लि नाला फटका बसला. तिच्या हातून भरपूर चुका झाल्या. बर्फाची पिशवी आणि ऊर्जावर्धक पेयांच्या आधारे तिने स्वत:ला खेळण्यायोग्य ठेवले. पहिला सेट गमावल्यानंतरही खचून न जाता चिवटपणे खेळ करत तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला.
घरच्या मैदानावर ग्रँड स्लॅम जेतेपदाचे समंथा स्टोसूरचे स्वप्न अधुरेच राहिले. सर्बियाच्या अॅना इव्हानोव्हिकने चुरशीच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरवर ६-७ (८-१०), ६-४, ६-२ असा विजय मिळवला. जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरने अमेरिकेच्या अॅलिसन रिस्कवर ६-३, ६-४ अशी मात करत चौथ्या फेरीत आगेकूच केली.
पुरुष गटात नोव्हाक जोकोव्हिचने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनवर ६-३, ६-३, ७-५ असा विजय मिळवत चौथी फेरी गाठली. या स्पर्धेचे चौथे जेतेपद पटकावण्यासाठी जोकोव्हिच शर्यतीत आहे. या लढतीत इस्टोमिनचे आव्हान सहजपणे संपुष्टात आणत जोकोव्हिचने जेतेपदासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.
चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचने बोस्निया आणि हझ्रेगोव्हिनाच्या डमीर झ्युमूरला ६-४, ६-२, ६-२ असे सहज नमवत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या स्पेनच्या डेव्हिड फेररने फ्रान्सच्या जेरोमी चार्डीवर ६-२, ७-६ (७-५), ६-२ अशी मात केली.
युकी-व्हीनसचा खळबळजनक विजय
मेलबर्न : वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या भारताच्या युकी भांबरी आणि मायकेल व्हीनसने १०व्या मानांकित जिन ज्युलियन रॉजर आणि होरिआ टेकाऊ जोडीवर सनसनाटी विजय मिळवला. लिएण्डर पेस आणि राडेप स्टेपानेक जोडीनेही सहज विजय मिळवत आगेकूच केली. युकी-व्हीनस जोडीने रॉजर-टेकाऊ जोडीवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत या खेळणाऱ्या जोडीने या लढतीत एकदाही ब्रेकपॉइंट्चा सामना केला नाही. युकी-व्हीनस जोडीला स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात पेस-स्टेपानेक या अनुभवी जोडीचा सामना करायला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाचव्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीने ल्युकास डौल्ही आणि ल्युकास रोसोल जोडीवर ६-४, ६-१ अशी सहज मात करीत आगेकूच केली. पुढच्या लढतीत पेस-स्टेपानेक जोडीची लढत इटलीच्या डॅनिइली ब्रासिली आणि युक्रेनच्या अलेक्झांड्र डोगलोपोव्हशी होणार आहे.