उष्णतेच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असताना जेतेपदासाठी रिंगणात असलेल्या अव्वल खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित करून तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. रॉजर फेडरर, राफेल नदाल, अँडी मरे, मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी आपापल्या लढती जिंकत तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले.
रॉजर फेडररने आपल्या गाठीशी असलेला अनुभवच श्रेष्ठ असतो, याची प्रचीती घडवत ब्लाझ केव्हकिकचा ६-२, ६-१, ७-६ असा धुव्वा उडवला. हिसेन्स एरिना कोर्टवरच्या आच्छादित कोर्टवर झालेल्या मुकाबल्यात फेडररने आपल्या शैलीदार खेळाचे प्रदर्शन करत तिसरी फेरी गाठली. गेल्या वर्षांत फेडररला एकाही ग्रँड स्लॅम विजेतेपदावर कब्जा करता आला नव्हता. मात्र याचा परिणाम त्याच्या क्रमवारीतील स्थानावरही झाला आहे. या स्पर्धेत सहाव्या मानांकित फेडररने स्टीफन एडबर्ग या ज्येष्ठ खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सहज विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने दणदणीत वर्चस्वासह १७ वर्षीय थान्सी कोकिनाकीसचा ६-२, ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला. गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे नदालला या स्पर्धेत खेळता आले नव्हते. मात्र पुनरागमनानंतर झंझावाती फॉर्ममध्ये असलेला नदाल जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. एक तास आणि ५३ मिनिटांत थान्सीला नमवत त्याने तिसरी फेरी गाठली. याचप्रमाणे अँडी मरेने फ्रान्सच्या व्हिन्सेट मिलोटचा ६-२, ६-२, ७-५ असा पराभव केला.
अन्य लढतीत जपानच्या केई निशिकोरीने सर्बियाच्या दुसान लाजोव्हिकचा ६-१, ६-१, ७-६ (७-३) असा पराभव केला. फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाने ब्राझीलच्या थॉमझ बेलुसीला ७-६ (८-६), ६-४, ६-४ असे नमवले.
महिलांमध्ये मारिया शारापोव्हाला तिसरी फेरी गाठण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. इटलीच्या करिन नॅपने शारापोव्हाला चांगलेच झुंजवले. तप्त वातावरणामुळे काही काळ स्थगित झालेली ही लढत ३ तास आणि २८ मिनिटे चालली आणि शारापोव्हाने ६-३, ४-६, १०-८ अशी जिंकली. काही दिवसांपूर्वी झालेल्या ब्रिस्बेन खुल्या स्पर्धेत खांद्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारी शारापोव्हा जेतेपदासाठी शर्यतीत आहे. शारापोव्हाची पुढची लढत फ्रान्सच्या अलिझ कॉर्नेटशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक द्वितीय मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने चेक प्रजासत्ताकच्या झाहलाव्होवा स्ट्रायकोव्हाचा ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. प्रचंड उन्हामुळे या लढतीसाठी कोर्टवरील छत बंद करण्यात आल्याने अझारेन्काला फायदा झाला. सलामीच्या लढतीत अझारेन्काने विजय मिळवला, मात्र तिच्या हातून खूप चुका झाल्या होत्या. मात्र या लढतीत व्यावसायिक खेळ करत अझारेन्काने स्ट्रायकोव्हाला कोणतीही संधी दिली नाही. अन्य लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकीने अमेरिकेच्या ख्रिस्तिना मॅकहॉलेवर ६-०, १-६, ६-२ असा विजय मिळवला. अॅग्निेझेस्का रडवानस्काने बेलारुसच्या ओल्गा गोव्हरत्सोव्हावर ६-०, ७-५ अशी मात केली.
बोपण्णा-कुरेशी यांची विजयी सलामी
मेलबर्न : प्रखर उष्णतेच्या आव्हानाला न जुमानता रोहन बोपण्णा आणि ऐसाम-उल-हक कुरेशी जोडीने रमीझ जुनैद आणि अॅड्रेन मन्नारिनो जोडीला नमवले आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या दुहेरी गटाची दुसरी फेरी गाठली. पहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचे ध्येय जोपासून भारत-पाकिस्तानच्या सातव्या मानांकित जोडीने आपल्या बिगरमानांकित प्रतिस्पर्धी जोडीला ६-३, ४-६, ७-६ (५) असे पराभूत केले. हा सामना एक तास आणि ४५ मिनिटे चालला. लिएण्डर पेस आणि झेक प्रजासत्ताकचा त्याचा सहकारी रॅडीक स्टेपानीक यांचा पहिल्या फेरीचा सामना रद्द करण्यात आला. झेक प्रजासत्ताकची जोडी ल्युकास डलौही आणि ल्युकास रसूल यांच्याशी त्यांची गाठ पडणार आहे.