सेरेना विल्यम्स तिसऱ्या फेरीत; महेश भूपती दुसऱ्या फेरीत, लिएण्डर पेसचे आव्हान संपुष्टात
सामनानिश्चिती प्रकरणाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे वातावरण झाकोळले आहे. मात्र वय, अनुभव आणि कर्तृत्व यांना साजेसा खेळ करत पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच यांनी तिसऱ्या फेरीत आगेकूच केली आहे. महिलांमध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सनेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवला.
तीन वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर असलेल्या फेडररने अलेक्झांड्र डोलगोपोव्हला ६-३, ७-५, ६-१ असे नमवले. सराव सहकारी अलेक्झांड्रला नमवत फेडररने तिसरी फेरी गाठली. गेल्या वर्षी या स्पर्धेत फेडररला तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आंद्रेस सेप्पीने खळबळजनक विजयाची नोंद केली होती. आता तिसऱ्या फेरीत फेडररची लढत ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे.
‘‘ग्रँड स्लॅम स्पर्धेत किमान तिसऱ्या फेरीत स्थान पटकावणे अपेक्षित आहे. सराव चांगला होत आहे. सामनाही चांगला झाला. पुढच्या लढतीसाठीही सज्ज आहे,’’ असे फेडररने सांगितले.
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आणि अग्रमानांकित जोकोव्हिचने फ्रान्सच्या क्वेटिन हाल्सवर ६-१, ६-२, ७-६ (७-३) अशी मात केली. जपानच्या केई निशिकोरीने ऑस्टिन क्रायजॅकचा ६-३, ७-६ (७-५), ६-३ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्याच निक कुर्यिगासने पाब्लो क्युव्हेसचा
६-४, ७-५, ७-६ असा पराभव केला.
महिलांमध्ये जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या सेरेनाने स्यु वेई सेहचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवत तिसऱ्या फेरीत वाटचाल केली
मारिया शारापोव्हाने अलिकसँड्रा सॅसोनोव्हिचवर ६-२, ६-१ असा सहज विजय मिळवला. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने युझेनी बोऊचार्डला ६-४, ६-२ असे नमवले. बेलिंडा बेनकिकने तिमेआ बाबोसवर ६-३, ६-३ अशी मात केली. डॅरिया गव्हिरलोव्हाने पेट्रा क्विटोव्हवर ६-४, ६-४ असा खळबळजनक विजय मिळवला.

भूपती दुसऱ्या फेरीत
महेश भूपतीने लक्झेंबर्गच्या गाइल्स म्युलरच्या साथीने खेळताना अलेक्स बोल्ट आणि अँड्रय़ू व्हिटिंगटॉन जोडीवर ७-६, ३-६, ६-४ असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. २ तास आणि १३ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या लढतीत भूपती-म्युलर जोडीने पंधरापैकी बारा ब्रेकपॉइंट्स वाचवत प्रतिस्पध्र्याना निष्प्रभ केले. २०१५ विम्बल्डन स्पर्धेनंतर भूपतीची ही केवळ तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या आयोजनात व्यस्त असल्याने भूपती हंगामाच्या उत्तरार्धात एकाही स्पर्धेत सहभागी झाला नाही. यंदा चेन्नई खुल्या स्पर्धेसह सुरुवात करणाऱ्या भूपतीने थायलंडमध्ये झालेल्या चॅलेंजर स्पर्धेत सहभाग नोंदवला. पुरव राजाच्या बरोबरीने खेळताना भूपतीने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. भूपतीचे यशस्वी पुनरागमन होत असताना, अनुभवी पेसला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्युआन सेबॅस्टियन कबाल आणि रॉबर्ट फराह जोडीने पेस आणि जेरेमी चार्डी जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली. अन्य लढतीत लिएण्डर पेसला मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.

Story img Loader