मेलबर्नच्या रॉड लेव्हर एरिनावर गेल्या तीन वर्षांपासून असलेले नोव्हाक जोकोव्हिचचे साम्राज्य अखेर स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाने खालसा केले. स्वित्र्झलडच्या वावरिंकाने चार तास कडवी झुंज देत पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचअस्त्र निष्प्रभ केले. सेरेना विल्यम्सला घरचा रस्ता दाखविणाऱ्या अ‍ॅना इव्हानोव्हिकलाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. महिलांमध्ये लि ना हिने विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत मजल मारली.
महान टेनिसपटू बोरिस बेकर यांचा आपल्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात समावेश केल्यानंतर जोकोव्हिच सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेवर अधिराज्य गाजवेल, असे वाटले होते. पण जोकोव्हिचचा विजय नियतीलाच मान्य नव्हता. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये शांतचित्ताने खेळ करत वावरिंकाने २-६, ६-४, ६-२, ३-६, ९-७ असा विजय मिळवून जोकोव्हिचची २८ सामन्यांची विजयी परंपरा खंडित केली. जोकोव्हिचच्या पराभवामुळे जेतेपदासाठीची शर्यत आता खुली झाली आहे. अलीकडेच चेन्नई स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या वावरिंकाला आता उपांत्य फेरीत झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचचा सामना करावा लागेल. ‘‘जोकोव्हिच हा जगज्जेता आहे. तो प्रतिस्पध्र्याला कधीही सहजासहजी जिंकू देत नाही, पण जोकोव्हिचवर मात केल्याने मी प्रचंड आनंदी आहे,’’ असे वावरिंकाने विजयानंतर सांगितले.
पहिला सेट जिंकून जोकोव्हिचने शानदार सुरुवात केली, मात्र फॉर्मात असलेल्या वावरिंकाने पुढील दोन सेट जिंकून जोकोव्हिचसमोर आव्हान निर्माण केले. अखेर जोकोव्हिचने चौथ्या सेटवर वर्चस्व गाजवत सामना बरोबरीत आणला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये दोघांनीही तोडीस तोड खेळ करत ५-५ अशी बरोबरी साधली. विश्रांतीनंतर मात्र जोकोव्हिचचा खेळ बहरलाच नाही. ७-८ अशा स्थितीनंतर जोकोव्हिचला आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण मिळवणे आवश्यक होते. पण क्रॉसकोर्टचा त्याचा फटका हुकला आणि स्वित्र्झलडच्या वावरिंकाने एका नव्या अध्यायाची नोंद केली.
बलाढय़ टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा पराभूत झाल्यानंतर आता चीनच्या लि ना हिला ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. लि ना हिने इटलीच्या फ्लेव्हिया पेनेट्टा हिचे आव्हान ६-२, ६-२ असे सहज मोडीत काढत उपांत्य फेरीत धडक मारली. सेरेनाला पराभूत करून खळबळ उडवून देणाऱ्या अ‍ॅना इव्हानोव्हिकला मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले. कॅनडाची युवा खेळाडू युगेन बौचार्ड हिने इव्हानोव्हिकला ५-७, ७-५, ६-२ असे पराभूत केले. आता बौचार्ड आणि दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असलेली लि ना यांच्यात उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे.
टॉमस बर्डिचने चार सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या मुकाबल्यात स्पेनच्या डेव्हिड फेररचा फडशा पाडला. ११व्या प्रयत्नांत ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या बर्डिचने रॉड लेव्हर एरिनाच्या मुख्य कोर्टवर पहिला विजय मिळवला. सातव्या मानांकित बर्डिचने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फेररला ६-१, ६-४, २-६, ६-४ असे पराभूत केले. बर्डिचला मात्र उपांत्य फेरीत कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्याची गाठ वावरिंकाशी पडणार आहे.