उपांत्यपूर्व फेरीत नोव्हाक जोकोव्हिचसारख्या प्रतिस्पध्र्याला गारद केल्यानंतर अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू राफेल नदालवर सरशी साधत आपणच ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी योग्य होतो, हे स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लॉस वावरिंकाने दाखवून दिले. नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर, नदाल आणि अँडी मरे यांची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरील मक्तेदारी वावरिंकाने संपुष्टात आणली. आता फेडररच्या कामगिरीचा अस्त जवळ आल्यामुळे वावरिंका हाच फेडररचा वारसदार असल्याची चर्चा आहे.
नदाल या स्पर्धेसाठी तुफान फॉर्मात होता. पण अंतिम फेरीत पाठीच्या दुखण्याने आणि तळहातावर झालेल्या जखमेमुळे त्रस्त असलेल्या नदालवर चार सेटमध्ये विजय मिळवणाऱ्या वावरिंकाच्या यशाबद्दल काहींचे दुमत निर्माण झाले. नदालवर ६-३, ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवत वावरिंकाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली खरी. पण खुद्द वावरिंकालाच जेतेपदाचे आश्चर्य वाटले.
उपांत्यपूर्व फेरीत पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या गतविजेत्या जोकोव्हिचवर मात करून वावरिंकाने सर्वाची वाहवा मिळवली होती. त्यामुळे विजयासाठी मीच योग्य असल्याचे वावरिंकाचे म्हणणे आहे. ‘‘जेतेपदामुळे मी आनंदी आहे. गेली काही वर्षे मी फेडररला अनेक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकताना पाहिले आहे. आता माझी वेळ आली आहे. गेल्या दहा वर्षांत फेडरर, नदाल, जोकोव्हिच आणि मरे या चौकडीनेच ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. गेल्या दोन आठवडय़ांत सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत मी ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. आता या चार जणांच्या पंक्तीत माझेही नाव झळकले आहे.’’
नदाल दुखापतग्रस्त असला तरी वावरिंकाने जमिनीलगतचे जोरकस फटके आणि ताकदवान सव्‍‌र्हिस करत त्याच्यावर दडपण आणले होते. वावरिंकाने सलग सात सामन्यांत चमकदार कामगिरी केली, तर नदालला पुन्हा एकदा शरीराने साथ दिली नाही. ‘‘मी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण अखेर वावरिंकाने बाजी मारली. जेतेपद गमावल्यामुळे मी निराश झालो. पण खेळात हार-जीत असतेच, हे मान्य करायलाच हवे.’’ प्रयत्न करत राहा, अपयशाने खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा अपयशी व्हा आणि त्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा, या सॅम्युएल बेकेटच्या वाक्याने वावरिंकाला नेहमीच प्रेरणा मिळत गेली आहे. वावरिंकाने हे वाक्य आपल्या हातावर कोरले आहे.

सानियाचे जेतेपदाचे स्वप्न अधुरे
मेलबर्न : सानिया मिर्झाचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. सानिया आणि तिचा रोमानियाचा सहकारी होरिया टेकाऊ यांना अंतिम फेरीत फ्रान्सची ख्रिस्तिना माडेनोव्हिक आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टॉर यांच्याकडून सरळ सेटमध्ये गाशा गुंडाळावा लागला. सानिया-टेकाऊ जोडीला ३-६, २-६ असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सानियाला मिश्र दुहेरीतील तिसऱ्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाने हुलकावणी दिली. माडेनोव्हिक-नेस्टॉर जोडीने पाचही ब्रेकपॉइंट्स मिळवीत सानिया-टेकाऊची सामन्यादरम्यान चार वेळा सव्‍‌र्हिस भेदली. सानियाने तीन वेळा सव्‍‌र्हिस गमावल्यामुळे माडेनोव्हिक-नेस्टॉर जोडीला सहज विजय साकारता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा