रुब्लेव्ह, शेल्टन, पॉलही उपांत्यपूर्व फेरीत; महिलांत प्लिस्कोव्हा, सबालेन्काचे विजय
मेलबर्न
Australian Open Tennis Tournament सर्बियाच्या २१ ग्रँडस्लॅम विजेत्या आणि चौथ्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच्यासह आंद्रे रुब्लेव्ह, बेन शेल्टन व टॉमी पॉल यांनी आगेकूच केली. महिलांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोव्हा, अरिना सबालेन्का, डोना व्हेकिच आणि माग्दा लिनेट यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
जोकोव्हिचने उपउपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनाउरवर ६-२, ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. पाचव्या मानांकित रुब्लेव्हने डेन्मार्कच्या नवव्या मानांकित होल्गर रुनला चुरशीच्या लढतीत ६-३, ३-६, ६-३, ४-६, ७-६ (११-९) असे पराभूत केले.अन्य उपउपांत्यपूर्व लढतीत टॉमी पॉल स्पेनच्या रॉबेटरे बटिस्टा अगुटवर ६-२, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवला. तर अमेरिकेच्याच शेल्टनने आपल्याच देशातील जेजे वूल्फवर ६-७ (५-७), ६-२, ६-७ (४-७), ७-६ (७-४), ६-२ अशी मात करत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.महिला विभागात पाचव्या मानांकित सबालेन्काने स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेंचिचला ७-५, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अन्य लढतीत, प्लिस्कोव्हाने चीनच्या झँग शुआईवर ६-०, ६-४ असा विजय साकारला.
सानिया-बोपन्नाची आगेकूच भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या अनुभवी जोडीने ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात उरुग्वेच्या एरिएल बेहर व जपानच्या माकोतो निनोमिया जोडीवर ६-४, ७-६ (११-९) असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.