वृत्तसंस्था, मेलबर्न
दोन सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना इटलीच्या २२ वर्षीय यानिक सिन्नेरने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. पाच सेट आणि जवळपास चार तास चाललेल्या अंतिम लढतीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करताना सिन्नेरने कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. चौथ्या मानांकित सिन्नेरने अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित मेदवेदेववर ३-६, ३-६, ६-४,
६-४, ६-३ अशी सरशी साधली. सिन्नेरने उपांत्य फेरीत अग्रमानांकित आणि २४ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला होता. मात्र, अंतिम फेरीत त्याला पहिल्या दोन सेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तो पराभवाच्या छायेत होता. परंतु त्याने लढवय्या वृत्ती दाखवली आणि सलग तीन सेट जिंकले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा सिन्नेर हा इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
हेही वाचा >>>IND vs ENG 1st Test : “एक संघ म्हणून आम्ही…”, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली नाराजी
मेदवेदेवची मात्र पुन्हा निराशा झाली. २०२१च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या विजेत्या मेदवेदेवला ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सहापैकी पाच अंतिम सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.यंदाच्या स्पर्धेत मेदवेदेवने तीन लढती पाच सेटमध्ये जिंकल्या. अंतिम लढतही पाचव्या सेटमध्ये गेल्यानंतर त्याचेच पारडे जड मानले जात होते. परंतु सिन्नेरने अचूक खेळ करताना मेदवेदेववर वर्चस्व गाजवले. निर्णायक पाचव्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना सिन्नेरने प्रथम आपली सव्र्हिस राखली, मग मेदवेदेवची सव्र्हिस तोडत ४-२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिन्नेरने पुन्हा दमदार सव्र्हिस करताना आपली आघाडी वाढवली. मेदवेदेवला आपली पुढील सव्र्हिस राखण्यात यश आले. मात्र, नवव्या गेममध्ये सिन्नेरने वेगवान सव्र्हिस केली आणि याचे मेदवेदेवकडे उत्तर नव्हते. त्यामुळे सिन्नेरने हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मेदवेदेव ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन सेटची आघाडी असूनही दुसऱ्यांदा पराभूत झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्पर्धेतच २०२२मध्ये त्याला राफेल नदालने दोन सेटची पिछाडी भरून काढताना नमवले होते.
३ मेदवेदेवला तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी त्याला अनुक्रमे जोकोविच (२०२१) आणि नदाल (२०२२) यांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम लढतीत नमवले होते.
मेदवेदेव आणि मी अनेक अंतिम लढती एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत. त्याच्याविरुद्ध खेळताना मला नेहमीच माझा खेळ उंचवावा लागतो. भविष्यात तो ही स्पर्धा जिंकेल अशी मला आशा आहे. यंदा मी विजेता ठरलो याचा खूप आनंद आहे. विशेषत: मी माझ्या पालकांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी कधीही माझ्यावर कसलेही दडपण टाकले नाही. मला हवे ते करण्याची मोकळीक दिली. त्यामुळेच मी इथवर पोहचू शकलो आहे. माझ्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. – यानिक सिन्नेर