ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी मालिका कायम राखत महिला गटातून व्हिक्टोरिआ अझारेन्काने जागतिक क्रमवारित १३व्या स्थानी असलेल्या सलोआन स्टेप्फेन्स हिचा परभावर करत उपांत्यपूर्व फेरीत सावध प्रवेश केला आहे.
दुसऱया बाजूला मारिआ शारापोवा आणि जागतिक क्रमवारित अव्वल स्थानी असलेली सेरेना विल्यम्स अशा मातब्बर खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने अझारेन्काने उपांत्यपूर्व फेरीत केलेला प्रवेश सावधच म्हणायला हवा. अझारेन्काने ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये स्टेप्फेन्सवर मात केली आणि उपांत्यपूर्व फेरीचे दार ठोठावले. मागील वर्षी या दोघीजणी उपांत्यफेरीत समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. यावेळस उपांत्यपूर्व फेरीतच यांची एकमेकांशी गाठ झाली. त्यामुळे विजयी आगेकूच मिळविण्याच्या हेतूने अझारेन्का प्रत्येक फटका सावधगिरीने खेळत होती.
अॅना इव्हानोव्हिकने सेरेनावर खळबळजनक विजय मिळविल्यानंतर या सामन्याकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, अझारेन्काने बळकट कामगिरी करत कोणताही चमत्कार होऊ दिला नाही आणि मीच विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले. जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी अझारेन्का उत्सुक आहे.