David Warner’s injury: बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कांगारू संघाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुढील दोन सामन्यांसाठी संघाबाहेर झाला आहे. वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली कसोटीत त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो दुसऱ्या डावात फलंदाजीलाही आला नव्हता.
वॉर्नर मायदेशी परतणार –
दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान वॉर्नरला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे दोन चेंडू लागले होते. सिराजचा एक चेंडू वॉर्नरच्या हाताला लागला आणि एक चेंडू त्याच्या डोक्याला देखील लागला होता. डोक्याला चेंडू लागल्याने वॉर्नर दिल्ली कसोटीतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी मॅथ्यू रेनशॉ कनकशन बदली खेळाडू म्हणून आला होता. सिराजचा चेंडू वॉर्नरच्या हाताला लागल्याने वार्नरला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तो पुढील दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. भारत दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नर मायदेशी परतणार आहे.
वॉर्नरपूर्वी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला भारत दौऱ्यातून वगळण्यात आले होते. हेझलवूड पायाच्या दुखापतीने त्रस्त होता. भारत दौऱ्यावर त्याने या दुखापतीतून सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तो या सामन्यासाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “डेव्हिड वॉर्नरला भारताच्या कसोटी दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. तो मायदेशी परतणार आहे. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत वॉर्नरला कोपराला दुखापत झाली आणि हेअरलाइन फ्रॅक्चर झाले होते. पुढील मूल्यमापनानंतर तो मायदेशी परतेल. त्याला रिहॅब आवश्यक आहे आणि आगामी सामन्यांना तो मुकेल. सध्या असा अंदाज आहे की, तो कसोटी मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात परतेल.”
हेही वाचा – Shoaib Akhtar criticizes Babar: ‘… म्हणून बाबर मोठा ब्रँड बनू शकला नाही’; शोएब अख्तरने बाबर आझमची काढली लाज
कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया ०-२ ने पिछाडीवर आहे. पॅट कमिन्सचा संघ नागपुरात एक डाव आणि १३२ धावांनी पराभूत झाला होता, तर भारताने दिल्ली कसोटीत त्यांचा ६ गडी राखून पराभव केला होता. या सलग दोन पराभवांनंतर कसोटी क्रिकेटमधील नंबर १चा मुकुटही ऑस्ट्रेलियाकडून हिसकावण्यात आला आहे. मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.