ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने गेल्या वर्षी ११ कसोटी सामन्यांमध्ये १०८० धावा केल्या होत्या. ज्यामुळे उस्मान ख्वाजाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) वार्षिक पुरस्कारांमध्ये शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इअर पुरस्कार जिंकला आहे. पॅट कमिन्सला आशा असेल की, उस्मान ख्वाजाने ९ फेब्रुवारीपासून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपला फॉर्म कायम ठेवावा. परंतु उस्मान ख्वाजा त्याच्या बॅट व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीवर विश्वास ठेवतो, ज्याला तो ‘रिंग ऑफ पॉवर’ म्हणतो. खुद्द उस्मानने याबाबत खुलासा केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने त्याच्या अंगठीची रंजक गोष्ट सांगितली आहे, जी तो नेहमी घालतो. अंगठीबद्दल विचारल्यावर उस्मान ख्वाजा म्हणतात, “रिंग ऑफ पॉवर…होय ती खूप छान आणि सुंदर आहे. एनआरएलमध्ये ३०० गेम खेळणाऱ्या खेळाडूंना रिंग दिल्या जातात, परंतु क्रिकेटमध्ये असे होत नाही. यामुळे, मी ऑनलाइन एक अंगठी पाहिली जी मला खूप आवडली.”
उस्मान ख्वाजा म्हणाला की, मी माझ्या सहकारी खेळाडूला विचारले की क्रिकेटमध्ये अंगठी का नसते, तेव्हा त्याने मला सांगितले की मी तुझ्यासाठी बनवतो. आम्ही अंगठीच्या डिझाइनबद्दल बोललो. जेव्हा त्याने अंगठी बनवली, तेव्हा ती खरोखर छान होती.
कसोटीतील उत्कृष्ट आकडे –
उस्मान ख्वाजाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने ५६ कसोटी सामन्यांच्या ९८ डावांमध्ये ४७.०८च्या सरासरीने ४१६२ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १९५ आहे. उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियन संघासोबत भारतात येऊ शकला नव्हता. तो २ दिवसानंतर संघात सामील झाला.
प्रवासाबद्दल तो म्हणाला, “सिडनी फ्लाइट खूप चांगली होती, जी थेट सिडनी ते बंगळुरु होती, पण मला ती पकडता आली नाही. ही खूप वाईट गोष्ट होती. लांबचा प्रवास होता. मला आधी मेलबर्नला जावं लागलं. सिडनीहून मेलबर्नला जाणाऱ्या फ्लाइटला ३ तास उशीर झाला आणि त्यामुळे मला तिथे पोहोचायला ५ ते ६ तास लागले. त्यानंतर मला मेलबर्न ते दिल्लीपर्यंत पोहोचायला आणखी ४ तास लागले. हा खूप थकवणारा प्रवास होता आणि मला फ्लाइटमध्ये बसून-बसून खूप त्रास झाला.”