एक काळ क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतात ४-० अशा लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यातच त्यांना टीकेचा घरचा आहेर दिला आहे तो त्यांच्या प्रसारमाध्यमांनी. सर्वच प्रसारमाध्यमांनी संघावर टीकेचे आसूड ओढले असून भारतील कामगिरी ही गेल्या ३४ वर्षांतली वाईट कामगिरी होती, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा भारतीय दौऱ्यावरील कामगिरीचा दर्जा हा अतिशय वाईट होता आणि हा देशवासीयांसाठी गेल्या ३४ वर्षांतील सर्वात वाईट अनुभव होता. मायकल क्लार्कच्या संघातील फुटीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट विश्वातील दर्जा घसरला आहे.
टेलिग्राफ

मूर्ख या शब्दाची प्रचीती भारतीय दौऱ्यात आली. ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱ्यावर मूर्खपणा करतच राहिला आणि आम्हाला त्यांच्याकडून वेगळ्या निकालाची अपेक्षा होती. अ‍ॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी या वेडय़ांच्या विभागातून बाहेर यायला हवे.
हेराल्ड सन

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सातत्याने त्याच चुकांची पुनरावृत्ती करत होते. दिल्लीत फिरोजशाह कोटलावर वॉटसन सर्वात मोठा अपराधी असेल, कारण पुन्हा एकदा प्रग्यान ओझाला चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. कर्णधाराच्या आदर्शवत पुस्तकात नक्कीच असे नाही. जडेजाच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धारातीर्थी पडत होते. संघाची धूळदाण शांत झाल्यावर सर्वच बाबींचा विचार करावा लागेल. क्लार्क आणि वॉटसन यांच्याकडून चमकदार कामगिरी झाली नाही, तसेच मिकी आर्थर यांच्या ‘ट्विटर’ खात्यानेही कमाल केली नाही.
सिडनी मॉर्निग हेराल्ड

Story img Loader