आयपीएल २०२३ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सला धक्का बसला आहे. सॅम बिलिंग्सनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही आगामी २०२३ च्या इंडिया प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे कमिन्सने हा निर्णय घेतला आहे. कमिन्सच्या आधी, इंग्लंडचा स्टार फलंदाज सॅम बिलिंग्सनेही खेळाच्या लांबलचक स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्यासाठी लीगच्या १६व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय कर्णधाराने कोलकाता नाईट रायडर्ससह शेवटच्या तीन आयपीएल स्पर्धा खेळल्या, परंतु हिपच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल २०२२ मध्ये फक्त पाच सामने खेळावे लागले, त्यात त्याने सात विकेट घेतल्या आणि ५३ धावा केल्या. कमिन्सने कदाचित आयपीएलमध्ये प्रभाव पाडला नसेल पण त्याची क्षमता सर्वांना माहीत आहे, त्यामुळे आगामी हंगामात केकेआरला त्याची उणीव भासू शकते.
कमिन्सने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून आगामी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. त्याने लिहिले की, “मी पुढील वर्षी आयपीएल न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. पुढील १२ महिन्यांचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक कसोटी आणि एकदिवसीय मालिकेने भरलेले आहे, त्यामुळे अॅशेस मालिका आणि विश्वचषकापूर्वी मी थोडी विश्रांती घेणार आहे. केकेआर मला समजून घेण्यासाठी. तुमचे खूप खूप आभार. खेळाडू आणि कर्मचार्यांचा इतका विलक्षण संघ आणि मी लवकरात लवकर तिथे परत येण्याची आशा करतो.”
घरच्या भूमीवर नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमिन्सची कामगिरी निराशाजनक होती, चार सामन्यांत ४४.०० च्या सरासरीने केवळ तीन विकेट्स घेतल्या आणि कमिन्सची खराब कामगिरी हे देखील गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीतून बाहेर काढण्याचे एक कारण होते. .तथापि, कमिन्सचे संपूर्ण लक्ष आता जून २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेवर आहे.