पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप ‘बीसीसीआय’ने केला आहे.

मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला ‘आयपीएल’मध्ये सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला आहे. ६ ते ११ मे या कालावधीत जयपूर येथे तिरंगी स्पर्धा होणार आहे.

पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात यावी, यासाठी ‘बीसीसीआय’वर दडपण आणण्याच्या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क (माजी कर्णधार) यांनी हा ई-मेल पाठवला आहे. नव्या दौरा आखणी कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाला जानेवारी २०२०मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे.