ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे एप्रिल महिन्यात रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी हॉकी इंडिया जय्यत तयारी करत असल्याचं समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी ड्रॅगफ्लिकर ख्रिस सिरीलोची भारतीय हॉकी संघात Analytical Coach म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिरीलोच्या नेमणुकीला ‘साई’ (Sports Authority of India) ने अद्यापही हिरवा कंदील दाखवला नसला तरीही हॉकी इंडियातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सिरीलोच्या नेमणुकीबद्दल वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारतीय हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात सिरीलोने आपल्या कामाला सुरुवात केली असून २०२० टोकीयो ऑलिम्पीकपर्यंत सिरीलो भारतीय संघासोबत Analytical Coach म्हणून काम पाहणार आहे. सध्या सिरीलो बंगळुरुच्या राष्ट्रीय अकादमीत आहे. त्याच्या नेमणुकीबद्दलची अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयातर्फे करण्यात येईल, असं हॉकी इंडियाने स्पष्ट केलं आहे.
अवश्य वाचा – अझलन शहा हॉकी २०१८ – ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा, भारतीय खेळाडूंचा निराशाजनक खेळ
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांना मदत करण्यासोबतच सिरीलो भारताच्या ड्रॅगफ्लिकींग सेक्शनमध्ये सुधारणा करण्यास मदत करणार आहे. पेनल्टी कॉर्नवर मिळणाऱ्या संधींचं गोलमध्ये रुपांतर करणं भारतीय खेळाडूंना जमत नाही. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या महत्वाच्या स्पर्धा लक्षात घेता सिरीलो भारताच्या ड्रॅगफ्लिकर्सवर आणखी मेहनत घेणार असल्याचं समजतंय.