आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण करणाऱया भारताच्या शिखर धवनने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी खेळत दीडशतक पूर्ण केले.
तिसऱया दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी धवन द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता. सलामीवीर मुरली विजयसोबत खेळताना धवनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. चौफेर फटकेबाजी करताना धवनने ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वांत वेगाने शतक ठोकण्याचा नवा विक्रम धवनने प्रस्थापित केला. शतकानंतरही त्याने आपली फटकेबाजी कायम ठेवली. कसोटी सामन्याचे कोणतेही दडपण धवनच्या खेळीवर जाणवत नव्हते. एकदिवसीय सामना खेळत असल्याप्रमाणे धवनने समोर आलेल्या प्रत्येक चेंडूला योग्य दिशेने टोलवले. तिसऱया दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भारताच्या बिनबाद २८३ धावा झाल्या होत्या. सलामीवीर मुरली विजय ८३ धावांवर तर धवन १८५ धावांवर खेळत आहेत. पहिल्या डावात भारत ऑस्ट्रेलियापेक्षा १२५ धावांनी पिछाडीवर आहे.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव शनिवारी ४०८ धावांवर आटोपला. मिचेल स्टार्क याने काढलेल्या ९९ धावा, स्टिव्हन स्मिथच्या ९२ आणि ईडी कोवनच्या ८६ धावा हे ऑस्ट्रेलियाच्या या डावातील फलंदाजीचे बलस्थान ठरले. या तिघांनी तारून नेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला. भारतीय गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे महारथी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
शुक्रवारच्या सात बाद २७३ धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर स्मिथ आणि स्टार्क जोडीने मैदानावर टिकून राहून खेळण्यास सुरूवात केली. मात्र, ओझाने ९२ धावांवर स्मिथला बाद केले. त्यानंतर ईशांत शर्माने स्टार्कला टिपले. त्यावेळी स्टार्क ९९ धावांवर होता. अवघ्या एक धावेने त्याचे शतक हुकले. अश्विनने झेव्हिअर डॉर्थी याला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा शेवट केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा