ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार अॅरॉन फिंचने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-२० क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने १२ वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे.
अॅरॉन फिंच तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. फिंचने ऑस्ट्रेलियासाठी ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. फिंचने आपल्या कारकिर्दीत ५ कसोटी, १४६ एकदिवसीय आणि १०३ टी-२० सामने खेळले आहेत.
निवृत्तीची घोषणा करताना फिंच म्हणाला की, ”माझी अशी भावना आहे की मी यापुढे २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत संघाला भविष्यातील रणनीतीवर काम करता यावे, यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.”
भारताविरुद्ध खेळलेली शेवटची संस्मरणीय खेळी –
नोव्हेंबर २०२० मध्ये, अॅरॉन फिंचने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्याने १२४ चेंडूत ११४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३७४ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ ३०८ धावाच करू शकला. भारताविरुद्ध फिंचची ही शेवटची आणि मोठी संस्मरणीय खेळी होती.
बिग बॅश लीगमध्ये खेळत राहणार –
टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार फिंच, बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत राहणार आहे. २०२२ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ फिंचच्या नेतृत्वाखाली टी-२० चे विजेतेपद वाचवू शकला नाही. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित झाले होते.